Yasin Malik Timeline : काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. एनआयए कोर्टाने काल यासिन मलिकला शिक्षा सुनावली. यासिन मलिक याने याआधीच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनआयए विशेष कोर्टाने 19 मे रोजी त्याला दोषी ठरवले होते. काल एनआयए कोर्टात शिक्षेवर सुनावणी झाली. एनआयएने यासिन मलिकला फाशीच्या शिक्षेच्या मागणी केली होती. यासिन मलिकविरोधात देशविरोधी कारवायाचा आरोप होता. मलिक विरोधात 'युएपीए' कायद्यातील कलमांसह इतरही अनेक गुन्हे दाखल आहेत. 


काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक विरुद्धच्या कारवाईची टाईमलाईन


ऑक्टोबर 1999: यासीन मलिकला भारतीय अधिकाऱ्यांनी सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत (PSA) अटक केली.


26 मार्च 2002: यासीन मलिकला दहशतवाद प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आणि त्याला जवळपास एक वर्ष नजरकैदेत ठेवण्यात आले.


मे 2007: यासीन मलिक आणि त्याचा पक्ष JKLF यांनी सफर-ए-आझादी म्हणून ओळखली जाणारी मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत, यासिन मलिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काश्मीरमधील सुमारे 3,500 शहरे आणि गावांना भेटी देऊन भारतविरोधी भूमिकेचा प्रचार केला.
 
2009 : इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी चित्रकार मिशाल मलिक हिच्याशी 42 व्या वर्षी विवाह केला.


फेब्रुवारी 2013 :   यासिन मलिकने पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा (LeT) प्रमुख हाफिज मुहम्मद सईदसोबत व्यासपीठ शेअर केले


12 जानेवारी 2016: यासिन मलिकने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पत्र लिहून गिलगिट-बाल्टिस्तानच्या पाकिस्तानमध्ये विलीनीकरणाला विरोध केला.


2017: नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने विविध फुटीरतावादी नेत्यांविरुद्ध दहशतवादी फंडिंगचा गुन्हा नोंदवला आणि 2019 मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात यासिन मलिक आणि इतर चार जणांची नावे नोंदवली.


26 फेब्रुवारी 2019: यासिन मलिकच्या घराची झडती घेण्यात आली आणि कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले.


10 एप्रिल 2019: NIA ने JKLF प्रमुख यासिन मलिकला जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी आणि फुटीरतावादी गटांना निधी पुरवल्याच्या प्रकरणात अटक केली.


मार्च 2020: यासिन मलिक आणि सहा साथीदारांवर 25 जानेवारी 1990 रोजी रावलपोरा, श्रीनगर येथे भारतीय हवाई दलाच्या 40 जवानांवर झालेल्या हल्ल्यासाठी जबाबदार धरत टाडा, शस्त्र कायदा 1959 अंतर्गत आरोप ठेवण्यात आले. 


मार्च 2022: दिल्ली न्यायालयाने पुराव्याची शहानिशा करत यासिन मलिक आणि इतरांविरुद्ध कठोर UAPA आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले.


10 मे 2022: मलिकने त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोप मान्य केलं.


19 मे , 2022: दिल्लीतील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) न्यायालयाने काश्मीर खोऱ्यातील कथित दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांशी संबंधित खटल्यात काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिकला 2016-17 मध्ये दोषी ठरवले.


25 मे 2022 : यासिन मलिकला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली