8 Years Of Modi Govt : देशातील राजकारणाच्या दृष्टीनं आठ वर्षांपूर्वीचा आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरला होता. कारण याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचं सरकार सत्तेत आलं होतं. आठ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारसमोर अनेक आव्हानं होती. पहिल्या पाच वर्षात त्यांनी या आव्हानांचा सामना करत लोकांना विकासाचं स्वप्न दाखवत अनेक योजना आणल्या अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. याच बळावर 2019 मध्ये ते दुसऱ्यांदा सत्तेत आले. आता मोदी सरकार सत्तेत येऊन आठ वर्ष पूर्ण होत आहेत. 


देशात मोदी सरकार सत्तेवर आलं त्याला आज आठ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं भाजप इलेक्शनच्या मिशन मोडवर आलं आहे.  भाजप अध्यक्ष जेपी नड्डा पक्षातील नेते आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक करत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकांची ( Loksabha 2024) तयारी भाजपनं आतापासूनच सुरु केली आहे. यासाठी खास रणनीती आखण्यात आली आहे.   या निमित्तानं मोदी सरकारच्या यशस्वी धोरणांची माहिती भाजप देशभर पोहोचवणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबाद आणि चेन्नईच्या दौऱ्यावर असतील. तिथं ते हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि शिलान्यास करतील. दुसरीकडे मोदी सरकारच्या कारकीर्दीबाबत भाजप देशभरात विशेष मोहीम राबवणार आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार जिथं दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते तिथं भाजप विशेष लक्ष देण्यात येणार आहे. अशा 144 मतदारसंघात केंद्रीय मंत्री प्रवास करणार आहेत. या अभियानासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची काल पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात गृहमंत्री अमित शाह यांच्यासह ज्येष्ठ मंत्रीही उपस्थित होते. 


भाजपनं अशा 144 लोकसभा मतदारसंघांची निवड केली आहे जिथं भाजप थोड्या अंतरानं पराभूत झाला. अशा मतदारसंघात लोकसभा प्रवास योजना (Loksabha Scheme) अंतर्गत केंद्रातील मंत्री यात्रा करणार आहेत. या यात्रेत हे मंत्री सरकारच्या कामाची माहिती देतील. पत्रकार परिषदा घेऊन भाजपचा प्रचार प्रसार केला जाईल. त्या त्या मतदारसंघातील स्थानिक आणि राजकीय माहिती गोळा करुन तसा रोडमॅप तयार केला जाणार आहे. 


यासाठी तीन समित्या तयार केल्या जाणार आहेत. केंद्रीय समिती, प्रदेश समिती, क्लस्टर समिती अशा त्या तीन समित्या असतील.  केंद्रीय समितीत राष्ट्रीय स्तरावरील नेते असतील. लोकसभा स्तरावर पक्षानं काही नियुक्त्या जाहीर करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.   लोकसभा प्रभारी, लोकसभा संयोजक, पूर्णवेळ कार्यकर्ता, सोशल मीडिया टीम, मीडिया टीम, लीगल टीम, केंद्र सरकारच्या 12 योजनांसाठी एक टीम अशा टीम कार्यरत केल्या जाणार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या


Modi@8: मोदी सरकारची आठ वर्ष! महत्वाच्या आठ योजना ज्यामुळं पंतप्रधान मोदी घराघरात पोहोचले...