Yasin Malik Case : काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. एनआयए कोर्टाने आज यासिन मलिकला शिक्षा सुनावली. यासिन मलिक याने याआधीच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनआयए विशेष कोर्टाने 19 मे रोजी त्याला दोषी ठरवले होते. आज एनआयए कोर्टात शिक्षेवर सुनावणी झाली. एनआयएने यासिन मलिकला फाशीच्या शिक्षेच्या मागणी केली होती. यासिन मलिकविरोधात देशविरोधी कारवायाचा आरोप होता. मलिक विरोधात 'युएपीए' कायद्यातील कलमांसह इतरही अनेक गुन्हे दाखल आहेत.
यासिन मलिकने कोर्टात सांगितले की, मला बुऱ्हान वाणीच्या चकमकीनंतर 30 मिनिटांत अटक करण्यात आली. अटलबिहारी वाजपेयींनी मला पासपोर्ट दिला होता. भारतात मला निवेदन सादर करण्यास सांगितले. मी गुन्हेगार नसल्याचे मलिकने कोर्टात सांगितले. मी 1994 मध्ये हिंसाचाराचा मार्ग सोडला आणि महात्मा गांधींच्या तत्वांवर चालण्यास सुरुवात केली. तेव्हापासून काश्मीरमध्ये अहिंसक आंदोलन करत असल्याचे मलिक याने कोर्टात सांगितले.
एनआयएने मलिकसाठी कलम १२१ (सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे) अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली. या प्रकरणात फाशीची शिक्षा मोठी असून किमान शिक्षा जन्मठेपेची आहे. यासिन मलिकने दिल्लीतील एनआयए कोर्टात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानंतर कोर्टाने 19 मे पर्यंत सुनावणी टाळली होती. मलिकने कोर्टाला सांगितले की, त्याच्या विरोधात लावण्यात आलेल्या आरोपांना आव्हान देणार नसल्याचे म्हटले होते.
यासिन मलिक विरोधात युएपीए कायद्यातील कलम 16 (दहशतवादी कायदा), 17 (दहशतवादी कृत्यासाठी निधी उभारणे), 18 (दहशतवादी कृत्य करण्याचा कट) आणि 20 (दहशतवादी टोळीचा सदस्य) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याशिवाय, भारतीय दंड विधान कायद्यातील 120-ब (गुन्हेगारी कट) आणि 124-अ (देशद्रोह) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यासिन मलिकने जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नावाखाली जगभरातून बेकायदेशीर आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारला असल्याचे कोर्टाने याआधी म्हटले होते. कोर्टाने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता फारुख अहमद उर्फ बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसुफ शाह, आफताब अहमद शाह, नयीम खान, मोहम्मद अकबर खंडय, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, झहूर अहमद शाह वातली, शबीर अहमद शाह, नवल किशोर कपूर आदींविरोधात आरोप निश्चित केले आहेत. त्याशिवाय लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेचा म्होरक्या सल्लाउद्दीन विरोधातही आरोप निश्चित केले आहेत.