मुंबई : केंद्र सरकारकडून नमामि गंगे यांसारख्या उपक्रमातून गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. परिस्थिती मात्र काहीही बदललेली नाही, हे चित्र उलट धोकादायक होत चालल्याचं वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड (WWF) या संस्थेच्या अहवालातून समोर आलं आहे.
गंगा ही जगातील सर्वात संकटग्रस्त नद्यांपैकी एक असल्याचं WWF ने आपल्या अहवालात म्हटलं आहे. कारण, देशात 2071 किलोमीटर क्षेत्रात वाहणाऱ्या गंगा नदीत इतर भारतीय नद्यांप्रमाणेच अगोदर पूर आणि नंदर दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत आहे.
उत्तराखंडपासून ते हिमालायातून बंगालच्या खाडीच्या सुंदरवनापर्यंत गंगा नदीवर मोठ्या प्रमाणात सिंचन केलं जातं. गंगा भारतात 2071 किमी आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये आपल्या सहाय्यक नद्यांसोबत 10 लाख वर्ग किमी या मोठ्या क्षेत्रात विस्तार करते.
उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातून गंगा नदी वाहते. गंगा नदीला येऊन मिळणाऱ्या उत्तरेकडील प्रमुख नद्यांमध्ये यमुना, रामगंगा, करनाली, तापी, गंडकी, कोसी आणि काक्षी यांचा समावेश आहे. तर दक्षिण पठाराहून येऊन मिळणाऱ्या नद्यांमध्ये चंबळ, सोन, बेतवा, केन, दक्षिणी टोस यांचा समावेश आहे. यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी सहाय्यक नदी आहे, जी हिमालयातील यमुनोत्रीहून उगम पावते.
गंगा नदी उत्तराखंडमध्ये 110 किमी, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 1450 किमी, बिहारमध्ये 445 किमी आणि पश्चिम बंगालमध्ये 520 किमीचा प्रवास करते आणि पुढे बंगालच्या खाडीला जाऊन मिळते.
गंगा नदीचं महत्त्व
भारतीय संस्कृतीमध्ये गंगा नदीचं मोठं महत्त्व आहे. गंगा ही भारताची ओळख आहे. ऋषिकेश, हरिद्वार, प्रयाग आणि काशी ही प्रसिद्ध तीर्थस्थळं गंगा नदीच्या काठावर आहेत. याशिवाय केदारनाथ, बद्रीनाथ आणि गोमुख गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या किनाऱ्यावर आहे. ज्या चार शहरांमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं, त्यापैकी दोन शहरं हरिद्वार आणि प्रयाग गंगा नदीच्या किनाऱ्यावर आहेत.
सर्वाधिक प्रदूषण कुठे?
IANS या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, गंगा नदी ऋषिकेशपासून प्रदूषित होत आहे. गंगेच्या किनाऱ्यावर वसवल्या जाणाऱ्या वसाहती चंद्रभागा, मायाकुंड या भागात शौचालयही नाहीत. ही सर्व घाण गंगा नदीत मिसळली जाते. कानपूरच्या (यूपी) विरुद्ध दिशेने 400 किमी गेल्यास गंगा नदीची दयनीय अवस्था दिसून येते.
ऋषिकेशपासून कोलकात्यापर्यंत गंगा नदी किनाऱ्यावर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रापासून ते रासायनिक खतनिर्मितीपर्यंतचे अनेक कारखाने आहेत, ज्यामुळे गंगेतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे.
भारतीय नद्यांचं संस्कृतीक आणि धार्मिक महत्त्व आहे. आधुनिक भारतातही नद्यांना तेवढंच महत्त्व दिलं जातं आणि लाखो भाविक या नद्यांमध्ये मोठ्या श्रद्धेने स्नान करतात. मात्र गंगा नदीची सध्याची परिस्थिती आणि WWF च्या या अहवालाने पर्यावरणप्रेमींची चिंता वाढवली आहे.
काय आहे WWF?
वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड म्हणजेच WWF स्थानिक पातळीपासून ते जागतिक पातळीवर निसर्ग संवर्धनासाठी गेल्या 60 वर्षांपासून काम करणारी संस्था आहे. WWF जवळपास शंभर देशांमध्ये वन संवर्धन, सागरीय जीवांचं संवर्धन, जल संवर्धन, वन्यजीव संवर्धन, अन्नसुरक्षा, हवामान बदल यावर काम करते.
गंगा जगातील सर्वाधिक संकटग्रस्त नद्यांपैकी एक, WWF चा धक्कादायक अहवाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Sep 2018 02:06 PM (IST)
देशात 2071 किलोमीटर क्षेत्रात वाहणाऱ्या गंगा नदीत इतर भारतीय नद्यांप्रमाणेच अगोदर पूर आणि नंदर दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -