जयपूर : पाकिस्तानमधील सत्ता परिवर्तनामुळे उभय देशांचे संबंध सुधारतील, अशी अपेक्षा पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला हजेरी लावल्यानंतर वादात सापडलेले काँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी व्यक्त केली. पाकिस्तानहून भारतात परतल्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर ही अपेक्षा आणखी मजबूत झाली, असंही ते म्हणाले.

राजस्थानमधील अजमेर शहरातील कार्यक्रमात सिद्धू बोलत होते. ''मित्राकडून (इम्रान खान) संदेश आला की आम्ही उभय देशांच्या संबंधांमध्ये सुधारणा करण्यासाठी उत्सुक आहोत. आपण या दिशेने एक पाऊल पुढे टाकला तर ते (पाकिस्तान) दोन पाऊल पुढे टाकतील,'' असा दावा सिद्धू यांनी केला.

“माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पाकिस्तानहून परतले तर कारगिलचं युद्ध झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानहून परतले तर पठाणकोटचा दहशतवादी हल्ला झाला. मात्र मी परतल्यानंतर झालेल्या वादामुळे माझ्या मित्राने (इम्रान खान) सांगितलं की आम्हाला शांती हवी आहे.. यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं, तर आम्ही दोन पाऊलं पुढे टाकू..”, असं सिद्धू म्हणाले.

''खेळाडू अडथळे दूर करतात. खेळाडू असो किंवा कलाकार, ते प्रेमाचा संदेश देतात आणि लोकांना एकत्र आणण्याचं काम करतात,'' असंही सिद्धूंनी युवा काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं.