Wrestlers Protest Delhi: दिल्लीतल्या जंतरमंतरवर नेहमी राजकीय, सामाजिक आंदोलनं होत असतात. पण बुधवारी याच जंतरमंतरवर देशातल्या ऑलिम्पिक पदक विजेत्यांना, जागतिक कुस्तीपटूंनाही आंदोलनाची वेळ आली. कुस्तीच्या आखाड्यापेक्षा राजकारणाच्या आखाड्यातच कुस्तीपटूंची उर्जा वाया जातेय की काय अशी शरमेची स्थिती निर्माण झालीय. या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे बृजभूषण सिंह हे नाव.


ब्रिजभूषण सिंह हे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष, यूपीच्या कैसरगंजमधून भाजप खासदार आणि राज ठाकरेंनी माफी न मागितल्यास अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी जाहीर धमकी देणारे नेते. हेच ब्रिजभूषण सिंह सध्या एका मोठ्या वादात अडकले आहेत. कारण ज्या कुस्ती महासंघाचे ते अध्यक्ष आहेत, त्याच कुस्तीतल्या माजी ऑलिम्पिक पदक विजेत्यांनी, वर्ल्ड चॅम्पियन्सनी त्यांच्या विरोधात धरणं आंदोलन सुरु केलंय. ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळासह इतर गंभीर आरोप केलेत. 


देशाच्या इतिहासातली ही अभूतपूर्व घटना आहे, जेव्हा ऑलिम्पिक पदक विजेत्यांना अशा पद्धतीनं रस्त्यावर आंदोलन करावं लागतं. बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक हे तीन मोठे खेळाडू आहेत, ज्यांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात हे आंदोलन सुरु केलं. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस. या आंदोलनाची दखल घेत क्रीडा मंत्रालयानं कुस्ती महासंघाला 72 तासांचा अल्टीमेटम पाठवलाय. आज काही कुस्तीपटूंना चर्चेलाही सरकारनं बोलावलं. 


या सगळ्या वादात आज कुस्तीपटू आणि भाजपची नेता बबिता फोगट हिनंही जंतरमंतरवर हजेरी लावली. आंदोलक कुस्तीपटू आणि सरकारमधली दुवा म्हणून तिनं भूमिका बजावली. 


सन 2011 सालापासून कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद ब्रिजभूषण सिंह यांच्याकडे आहे. त्यांची तिसरी टर्म एका वर्षात संपणार आहे. आता चॅम्पियन कुस्तीपटूंनी असे गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्याकडे हे पद राहतं का याचीही उत्सुकता आहे. तूर्तास हे सगळे आरोप चुकीचं आहेत. जे आरोप करतायत त्यांची कारकीर्द उताराला लागल्याचं आणि काही हेतूनं ते आरोप करत असल्याचा दावा त्यांनी केलाय. बृजभूषण आणि वाद हे समीकरण काही नवीन नाहीय. 


बृजभूषण आणि वादांची मालिका


- बाबरी विध्वंस प्रकरणातले आरोपी, मुंबईतल्या जेजे हॉस्पिटल शूट आऊटमध्ये दाऊदच्या हस्तकांना मदत केल्याचा आरोप ते स्थानिक लेवलला 55 इंटर कॉलेजच्या संस्थांचं जाळं असा सगळा त्यांचा प्रवास आहे. 


- सहा वेळा खासदार, सुरुवात भाजपमधून नंतर सपात आणि 2014 च्या आधी पुन्हा भाजपमध्ये अशी त्यांची राजकीय कारकीर्द.


- राम मंदिर आंदोलनाच्या निमित्तानं त्यांचे अयोध्येतल्या संताशींही संबंध आले आहेत. सध्या ते यूपीच्या कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.


- राज ठाकरेंनी अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय पाऊल ठेवू देणार नाही अशी आक्रमक भूमिका बृजभूषण यांनी घेतली होती. नंतर राज ठाकरे यांचा तो दौरा झालाच नाही


कुस्ती महासंघानं काही वर्षांपूर्वी धोरण बदललं, ऑलिम्पिकसाठी पात्र व्हायचं असेल तर इतर चॅम्पियनशीप जिंकला म्हणून तुम्हाला कोट्यातून प्रवेश मिळणार नाही अशी भूमिका घेतली. बड्या बड्या खेळाडूंनाही त्यामुळे पुन्हा ट्रायल देऊनच प्रवेश मिळू लागला. त्या धोरणावरही खेळाडूंची नाराजी आहे. कोचच्या सिलेक्शन प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलंय. 


सध्या जंतरमंतरवर जे आंदोलनाला बसलेत ते बहुतांश खेळाडू हरियाणाचे आहेत. अर्थात कुस्तीमध्ये हरियाणाचं वर्चस्व आहेच. हरियाणात कुस्ती फेडरेशन सुरु करायला आपण परवानगी दिली नाही. त्यामुळे तिथल्या एका बड्या उद्योजकानं काहींना हाताशी धरुन हे षडयंत्र आखल्याचा बृजभूषण सिंह यांचा दावा आहे. नव्या धोरणांमध्ये हरियाणाच्या एकहाती वर्चस्वाला जागा मिळत नव्हती त्यामुळे प्रादेशिक वादाचीही किनार याला असल्याचं बोललं जातंय. 


आधीच क्रीडा या विषयाकडे आपण उदासीनतेनं बघतो. त्यात ज्या मोजक्या खेळांमध्ये आपण ऑलिम्पिक पदकापर्यंत पोहोचतो. त्याच खेळांमध्ये जर खेळाडूंवर अशी आंदोलनाची वेळ येत असेल त्यासारखं दुर्दैव ते काय. त्यामुळे हा वाद तातडीनं मिटणं हेच क्रीडा जगताच्या आणि कुस्तीच्या दृष्टीनं फायद्याचं असेल.  


संबंधित बातमी: