Raghuram Rajan Statement : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पाठिंबा दिला आहे. रघुराम राजन यांनी राहुल गांधींची बाजू घेताना त्यांना पप्पू म्हणून हिनावऱ्यांना उत्तर दिलं आहे. तसेच, राहुल गांधी हे पप्पू नव्हे, अत्यंत हुशार आहेत, असं रघुराम राजन यांनी सांगितलं आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात राजस्थानमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) रघुराम राजन सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'पप्पू' म्हणून तयार करण्यात आलेली प्रतिमा दुर्दैवी असल्याचं म्हटलं होतं.
एका मुलाखतीत रघुराम राजन म्हणाले की, त्यांना राहुल यांची पप्पू म्हणून तयार केलेली इमेज दुर्दैवी वाटते. राहुल गांधी अजिबात 'पप्पू' (मूर्ख) नाहीत. ते एक हुशार, तरुण, जिज्ञासू व्यक्तिमत्व आहे. महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येकाला जोखीम आणि त्यांचं मूल्यमापन करण्याची क्षमता या सर्व गोष्टींची चांगली जाण असणं महत्त्वाचं आहे आणि या सर्व गोष्टींसाठी राहुल गांधी सक्षम आहेत.
केंद्र सरकारबद्दल रघुराम राजन म्हणतात...
भारत जोडो यात्रा ज्या कारणांसाठी सुरु आहे, त्या मूल्यांसाठी आपण राहुल गांधी यांच्यासोबत जोडले गेलो असल्याचा असा खुलासाही रघुराम राजन यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्राच्या आर्थिक धोरणांवर टीका करण्यासंदर्भात रघुराम राजन म्हणाले की, "मी मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारवरही टीका करत होतोच." तसंच निवडणुकीच्या राजकारणात कोणताही रस नसल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
रघुराम राजन ज्यावेळी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते, त्यावेळी त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली होती. मुलाखतीत बोलताना रघुराम राजन यांनी यासंदर्भासह स्पष्टीकरण दिलं. भारत जोडो यात्रेत सहभाग हा कोणत्याही राजकीय हेतूने किंवा पक्षात सहभागी होण्यासाठी घेतला नव्हता. भारत जोडो यात्रा ज्या कारणांसाठी काढण्यात आली आहे. ती कारण पटली असून त्या मूल्यांसोबत उभं राहायचं होतं. त्यामुळेच यात्रेत राहुल गांधींसोबत सहभाग घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यासोबतच राजकारणात प्रवेश करायचा नाहीय आणि तसा अजिबातच हेतू नाही, असंही रघुराम राजन यांनी स्पष्ट केलं.
रघुराम राजन यांनी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारवर साधलेला निशाणा
काही दिवसांपूर्वीच रघुराम राजन यांनी केंद्र सरकारच्या अनेक धोरणांवर टीका केली होती. सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नाही. परंतु, तरीही सरकार सत्य स्वीकारण्यास तयार नाही आणि या प्रश्नाचे गांभीर्य सातत्याने कमी करत असल्याचे राजन म्हणाले होते. इतकेच नव्हे तर आर्थिक मंदीच्या समस्येवर मात करण्यासाठी मोदी सरकारला ही समस्या मान्य करावी लागेल कारण ती लपवून ठेवल्याने परिस्थिती सुधारणार नाही असेही ते म्हणाले होते. देशात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांनी सावधगिरीचा इशाराही दिला होता. जगात भारताची प्रतिमा 'अल्पसंख्यांक विरोधी' बनली तर भारतीय कंपन्यांचं नुकसान होऊ शकतं. भारतीय उत्पादनांसाठी मार्केटमध्ये ही धोक्याची घंटा आहे. भारताची अशी प्रतिमा झाल्यानंतर विदेशी सरकारं आपल्या राष्ट्रावर विश्वास ठेवायला सहज तयार होणार नाहीत. अशामुळे गुंतवणूकदार आपल्याकडे गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहणं बंद करु शकतात, असंही रघुराम राजन यांनी म्हटलं होतं.