Anurag Thakur On Wrestlers Protest: केंद्र सरकारनं भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पुन्हा चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिली. क्रीडामंत्र्यांनी ट्वीट केलं की, "सरकार कुस्तीपटूंशी त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. यासाठी मी पुन्हा एकदा कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे."
याआधी ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया यानं माध्यमांना माहिती दिली होती की, कुस्तीपटू आणि त्यांच्या प्रशिक्षकांची शनिवारी (3 जून) रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत गृहमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्याचंही यावेळी बोलताना बजरंग पुनिया म्हणाला.
बजरंग पुनियासह आंदोलक कुस्तीपटू म्हणाले, नोकरीची भीती दाखवू नका
याआधी सोमवारी (5 जून) कुस्तीपटू आंदोलनातून माघार घेऊन रेल्वेत नोकरीवर परतल्याच्या बातम्या आल्या होत्या. कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी हे वृत्त फेटाळून लावलं. तसेच त्यांनी सोमवारी (5 जून) यासंदर्भात एक ट्वीट केलं. ते म्हणाले की, "आमच्या पदकांना 15-15 रुपयांचे म्हणणारे आता आमच्या नोकरीच्या मागे लागलेत. आमचं संपूर्ण आयुष्य दाव्यावर आहे, त्यासमोर नोकरी ही फार छोटी गोष्ट आहे. नोकरी न्यायाच्या मार्गात अडथळा ठरत असेल, तर तिच्यावर पाणी सोडताना आम्ही दहा सेकंदही विचार करणार नाही. आम्हाला नोकरीची भीती दाखवू नका."
दुसर्या ट्वीटमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियानं देशवासीयांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढाई (आंदोलन) सुरूच राहणार असल्याचंही सांगितलं आहे.
ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंचं आंदोलन
यावर्षी 18 जानेवारी रोजी बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्यासह सुमारे 30 कुस्तीपटू लैंगिक छळाच्या आरोपाखाली बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर धरणं धरलं होतं. 19 जानेवारी रोजी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी कुस्तीपटूंनी उशिरापर्यंत चर्चा केली. त्यानंतर बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट आणि रवी दहिया यांनी क्रीडामंत्र्यांची भेट घेतली. याप्रकरणी सरकारनं कुस्तीगीरांना कारवाईचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर कुस्तीपटूंनी आपलं आंदोलन मागे घेतलं.
यानंतर 23 एप्रिल रोजी कुस्तीपटू पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलं. 24 एप्रिल रोजी क्रीडा मंत्रालयानं सांगितलं होतं की, भारतीय ऑलिम्पिक संघटना 45 दिवसांच्या आत कुस्ती महासंघाच्या कार्यकारी समितीच्या निवडणुका घेण्यासाठी अस्थायी समिती स्थापन करेल.
13 मे रोजी भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व अधिकार्यांना या संस्थेच्या कामाकाजासंदर्भात सर्व निर्णय घेण्यास पूर्णपणे प्रतिबंधित केलं. यानंतर 7 मे रोजी कुस्ती महासंघाच्या निवडणुका होणार होत्या, त्या क्रीडा मंत्रालयानं रद्द केल्या.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी कुस्तीपटू सातत्यानं करत आहेत. दिल्ली पोलिसांनी बृजभूषण यांच्याविरोधात दोन एफआयआर नोंदवले आहेत. 28 मे रोजी कुस्तीपटूंनी नवीन संसदेजवळ महिला महापंचायत घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांचे सामान जंतरमंतरवरून हटवलं.
यानंतर कुस्तीपटूंनी हरिद्वारमधील गंगा नदीत त्यांची पदकं विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आणि अन्य समर्थकांनी कुस्तीपटूंची समजूत काढली, त्यानंतर कुस्तीपटूंनी गंगेत पदकं विसर्जित करण्याचा निर्णय मागे घेतला. कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ, शेतकऱ्यांनी यूपीमधील मुझफ्फरनगर आणि हरियाणातील कुरुक्षेत्र येथे 2 जून रोजी खाप महापंचायत आयोजित केली.
दरम्यान, मंगळवारी (6 जून) दिल्ली पोलिसांनी बृजभूषण यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे सहकारी आणि उत्तर प्रदेशातील गोंडा येथील त्यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या लोकांचे जबाबही नोंदवले. न्याय मिळेपर्यंत आपलं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं सध्या कुस्तीपटूंनी सांगितलं आहे.