PM Kisan Nidhi 14th installment: वर्षभरापासून बरसत असलेला अवकाळी पाऊस आणि त्यासोबतच रखरखतं ऊन, यामुळे बळीराज्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अशातच शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार हलका व्हावा यासाठी राज्य सरकार (State Government) आणि केंद्र सरकार (Central Government) नवनव्या योजना आणत असतात. अशीच एक योजना म्हणजे, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. या योजनेंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये शासनाकडून दिले जातात. ही योजना संपूर्ण देशात लागू होणार आहे. मात्र आता त्याच धर्तीवर आणखी एक योजना राज्य सरकारनं सुरू केली असून, त्यानुसार आता शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांऐवजी 10 हजार रुपये दिले जाणार आहेत.


काय आहे ही नवी योजना? 


मध्य प्रदेश सरकारनं ही नवी योजना सुरू केली असून तिला किसान कल्याण योजना असं नाव दिलं आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या कल्याणासाठी दरवर्षी 10 हजार रुपये देणार आहे. म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत दरवर्षी मिळणारे 6 हजार रुपये नक्कीच मिळतील. मात्र यासोबतच शेतकऱ्यांना चार हजार रुपये देण्यात येणार आहेत. मध्यप्रदेश सरकारनं 2020 मध्येच ही योजना सुरू केली होती. त्यावेळी हा पैसा दोन हप्त्यांमध्ये दोन हजारांच्या रूपानं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात होते. दरम्यान, महाराष्ट्र सरकारनंही या योजनेतंर्गत देण्यात येणारी रक्कम 12 हजार रुपये केली आहे. 


कोणत्या शेतकऱ्यांना होणार फायदा? 


या योजनेचा लाभ फक्त मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, मध्यप्रदेशातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसून, ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे आलेले नाहीत, त्यांच्या खात्यातही हे पैसे येणार नाहीत. 


काय आहे पीएम किसान योजना? 


पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजना ही केंद्राची योजना असून याचा सर्व खर्च केंद्र सरकारकडून केला जातो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने डिसेंबर 2018 साली केली होती. या अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपये अशा तीन हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जातात. 


पीएम किसान योजनेत आपले नाव पाहण्यासाठी खालील प्रक्रिया पार पाडावी 


1. PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in भेट द्या. 
2. त्यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली Farmers Corner असा ऑप्शन येईल.
3. Farmers Corner मध्ये Beneficiaries List या ऑप्शनवर जा.
4. त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा. 
5. त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये आपले नाव पाहू शकता.