Wrestlers Protest At Jantar Mantar: शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात जंतरमंतरवर मोदी सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट तसेच राकेश टिकैत आणि महत चौबिसी खाप पंचायतीचे प्रमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अनेक महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असूनही बृजभूषण सिंह यांच्याविरोधात मोदी सरकारने कोणतीही कारवाई केली नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीपटूंचे जंतरमंतरवर आंदोलन सुरु आहे.
खाप पंचायतीचे प्रमुख म्हणाले की, आजच्या पंचायतीमध्ये असे ठरले आहे की आमच्या खापचे लोक रोज या ठिकाणी येतील. जर सरकारने 15 दिवसांत निर्णय मान्य न केल्यास 21 मे रोजी पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील रणनीती काय असेल याबाबत निर्णय घेतला जाईल. खाप पंचायत असो की शेतकरी संघटना, बाहेरून पैलवानांनी सुरू केलेल्या संघर्षाला आम्ही सर्वजण पाठिंबा देत आंदोलनाला बळ देऊ. बृजभूषण यांचा राजीनामा घेऊन त्यांना तुरुंगात टाकावे म्हणजे आमच्या मुलींवर हात टाकणाऱ्याला न्यायालयात शिक्षा व्हावी. सरकारला 21 मेची मुदत दिली आहे. त्यानंतर मोठा निर्णय घेतला जाईल.
काय म्हणाले राकेश टिकैत?
राकेश टिकैत म्हणाले की, आमच्या गावातील लोक दिवसा येतील आणि रात्री निघून जातील. ज्यांना रात्री मुक्काम करायचा आहे ते थांबू शकतात. जी समिती नियुक्त झाली आहे तीच समिती हे आंदोलन चालवणार आहे. आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ. सरकारने 21 तारखेपर्यंत चर्चा करून तोडगा काढला नाही, तर त्यानंतर पुन्हा रणनीती आखली जाईल. ही मुले आपला आणि देशाचा वारसा आहेत. आम्ही शक्य ती सर्व मदत करू. हे आंदोलन दीर्घकाळ सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी आपल्याला तयार राहावे लागेल. देशभरात आंदोलन करण्याची तयारी आहे. 21 रोजी 5 हजार शेतकरी जंतरमंतरवर मोर्चा काढणार आहेत.
पोलिसांच्या परवानगीवर काय म्हणाले?
पोलिसांच्या परवानगीवर टिकैत म्हणाले, की आजही पोलिसांची परवानगी नव्हती, तरीही आम्ही आलो. आम्ही कोणतेही आंदोलन हायजॅक केलेले नाही. ही चळवळ फक्त या पैलवानांची आहे. आमचा बाहेरून पाठिंबा आहे.
काय म्हणाली विनेश फोगट?
विनेश फोगट म्हणाली, की आम्ही सर्व ज्येष्ठांचा आदर करतो. 21 तारखेनंतर आमच्याकडून मोठे कॉल घेतले जाऊ शकतात. आमचे आंदोलन कोणीही हायजॅक केलेले नाही. देशातील मुलींचे हे आंदोलन आहे. लढा कितीही लांबला तरी आम्ही लढायला तयार आहोत. आम्ही स्पर्धेत नक्कीच भाग घेऊ. आमचे प्रशिक्षण सुरू राहावे यासाठी आम्ही नियोजन करत आहोत. आमची एकच मागणी आहे की बृजभूषण सिंह यांना अटक करून त्यांची चौकशी करावी.
इतर महत्वाच्या बातम्या