मुंबई: एकीकडे गुजरातच्या विकासाच्या मॉडेलचा देशभर प्रचार केला जात असताना दुसरीकडे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या पाच वर्षात गुजरातमधून तब्बल 4 हजाराहून अधिक महिला या बेपत्ता झाल्याचं नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून समोर आलं आहे. 


एनसीआरबीच्या अहवालानुसार, गुजरातमध्ये 2016 साली 7,105, 2017 साली 7,712, 2018 साली 9,246 आणि 2019 साली 9,268 इतक्या मुली आणि महिला बेपत्ता झाल्याचं सांगण्यात आलं आहे. 2020 साली एकूण 8,290 महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्या आधीच्या चार वर्षामध्ये बपत्ता महिलांची संख्या वाढतच चालल्याचं दिसून येतंय. या एकूण पाच वर्षामध्ये तब्बल 41,621 महिला बेपत्ता झाल्याचं या अहवलात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे गुजरातच्या कायदा आणि व्यवस्थेवर एक प्रकारचा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. 


गुजरातमध्ये भाजपचे सरकार असून या सरकारने विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 2019-20 या वर्षी गुजरातमध्ये 4,722 महिला बेपत्ता झाल्या होत्या. गुजरातमध्ये गेल्या 25 वर्षांपासून भाजपचे सरकार सत्तेत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह हे गुजरातचे असल्याने एनसीआरबीची ही आकडेवारी अधिक गंभीर असल्याचं मानलं जात आहे. 


महाराष्ट्रात मार्च महिन्यात सरासरी 70 मुली बेपत्ता 


मार्च महिन्यात महाराष्ट्रातील तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. सरासरी पाहिलं तर रोज 70 मुली राज्यातून बेपत्ता होत असल्याचं समोर आलं आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत 390 ने वाढ झाली असून ही आकडेवारी गंभीर आहे.  बेपत्ता होणाऱ्या मुलींचं प्रमाण हे 18 ते 25 या वयोगटातील अधिक आहे. जानेवारी 2023 ते मार्च 2023 या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता, राज्यातील 5,610 मुली बेपत्ता झाल्याचं स्पष्ट आहे. नोकरी, लग्न, प्रेमाचं आमिष दाखवून मुलींची दिशाभूल केली जात असून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. 


मार्च महिन्यात राज्यातून 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत, त्या आधी फेब्रुवारी महिन्यात ही संख्या 1810 इतकी होती. त्यामुळे एकाच महिन्यात बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत 390 ने वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे.


बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये अल्पवयीन मुलींच्या आकडेवारीचा समावेश नाही. त्या मुलींची ओळख जाहीर केली जात नाही. त्यांची नोंद अपहरणाच्या केसमध्ये केली जाते. तर 18 वर्षावरील मुली आणि महिला बेपत्ता झाल्यास, तशी तक्रार आल्यास पोलिसामध्ये त्याची नोंद केली जाते. काही पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून किंवा वेगवेगळ्या आमिषाला बळी पडून घर सोडून जाणाऱ्या मुलींचे प्रमाण जास्त आहे.