Wrestler's Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी पुन्हा जंतर-मंतर या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे. सात महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून बृजभूषण सिंह यांना अटक केल्यांतरच हे आंदोलन मागे घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 


भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर काही महिन्यांपूर्वी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हा कुस्तीपटूंकडून तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत हे कुस्तीपटू पुन्हा एकदा आंदोलनासाठी बसले आहेत.


 






नेमकं काय आहे प्रकरण?


भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला. विनेश फोगटसारख्या दिग्गज कुस्तीपटूंच्या नेतृत्वाखाली जानेवारीत कुस्तीपटूनी आंदोलन केले होते. तेव्हा लखनौ येथील राष्ट्रीय शिबिरात महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण होत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता. संपूर्ण पुराव्यासहित हा दावा कुस्तीपटूंकडून करण्यात आला होता.  परंतु केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकुर यांच्यासोबत चर्चा करून तेव्हा आंदोलन मागे घेण्यात आलं. 


आता कुस्तीपटूंचं म्हणणं काय?


दोन दिवसांपूर्वी तक्रार देऊनसुध्दा आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही आहे, असं हे कुस्तीपटू म्हणत आहेत.या कुस्तीपटूंचं असं म्हणणं आहे की, 'तीन महिने झाले तरी आम्हाला न्याय मिळाला नाही, त्यामुळे आम्ही पुन्हा आंदोलन करत आहोत'. 'आम्हाला न्याय हवा आहे, आतापर्यंत साधी एफआरआय सुध्दा दाखल झाली नाही, आम्हाला आधी सांगण्यात आलं होतं की आधी तुम्ही एआयआर करा, आता आम्ही एआयआर करायला आलो आहोत तर पोलीस आमचं म्हणणं एकून घेत नाही आहेत.' असं देखील हे कुस्तीपटू सांगत आहेत.  आता जेव्हा आमच्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली जाईल तेव्हाच आम्ही हे आंदोलन मागे घेऊ असा इशारा देखील कुस्तीपटूंनी दिला आहे. तसेच याची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात येत आहे. 


आता पुढे काय?


या कुस्तीपटूंना धमक्या मिळत असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. पोलीस अधिकारीसुध्दा काही एकून घेण्यास तयार नसल्याची खंत त्यांच्य़ाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता यावर सरकार काय भूमिका घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्याचप्रमाणे या कुस्तीपटूंना न्याय मिळेल की त्यांचं आंदोलन असंच सुरू राहील हे देखील पाहावं लागेल.