नवी दिल्ली : दोन वेळा ऑलंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या एका कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी अटकेत आहे. हत्येच्या गुन्ह्याचा तपास सुरु असल्यानं रेल्वेनं आता त्याला नोकरीवरुन निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुशील कुमारच्या निलंबनाची माहिती उत्तर रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


सुशील कुमारने दोन वेळा ऑलंपिक पदकं जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्याच्या या विक्रमाचा सन्मान म्हणून उत्तर रेल्वेने त्याला ऑफिसन ऑन स्पेशल ड्यूटी हे पद दिलं होतं. आता त्याच पदावरुन सुशील कुमारचं निंलबन करत असल्याची माहिती उत्तर रेल्वेनं दिली आहे. त्याच्यावर हत्येचा आरोप असून त्याचा तपास सुरु आहे, यामुळे त्याला नोकरीवर ठेवता येणार नाही असं रेल्वेनं स्पष्टीकरण दिलं आहे. 


छत्रसाल स्टेडियममध्ये 23 वर्षीय कुस्तीपटू सागर धनखरच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्लीच्या रोहिणी कोर्टानं सहा दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवलं आहे. सुशीलचा साथीदार अजय यालाही कोर्टाने 6 दिवसांच्या पोलिस रिमांडवर पाठवलं आहे.


20 दिवसानंतर दिल्लीच्या मुंडका येथून आरोपीला अटक
ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजय यांना 20 दिवसानंतर अटक करण्यात आली आहे. आपल्या साथीदाराबरोबर एकाला भेटायला स्कूटीवर जात असताना सकाळी सुशील कुमार व त्याचा साथीदार अजय याला दिल्ली पोलिसांनी मुंडका मेट्रो स्टेशनवरून अटक केली.


कुस्तीपटू सागर धनखरच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलीस तपास करत आहेत. सुशील कुमारचा संबंध काही गॅंगस्टरशी असल्याची माहिती पोलीस तपासातून पुढं येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. 


सरकारने आता सुशील कुमारचा पद्म पुरस्कारही काढून घ्यावा अशी मागणी होत आहे. 


महत्वाच्या बातम्या :