मुंबई : "गुप्त बैठक 200 लोकांसमोर होत नसते," असं सांगत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रत्नागिरीत गुप्त भेट झाल्याचा इन्कार केला. बैठक बंद खोलीत झाली नाही, दाराआड झाली नाही, तर समोरासमोर झाली. त्यावेळी आरोप करणारे माझ्यासमोरच बसले होते. जी चर्चा झाली ती स्वागताच्या दृष्टीने झाली आणि सगळ्यांच्या समोर झाली, असं उदय सामंत म्हणाले. माजी खासदार निलेश राणे यांनी उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीतील विश्रामगृहात गुप्त भेट झाल्याचा दावा केला होता. त्यावर उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.


उदय सामंत म्हणाले की, "ज्या मंडळींना कोकणाने दोन वेळा नाकारलं आहे, त्यांनी माझं राजकीय अस्तित्त्व अस्थिर करण्यासाठी माझी गुप्त भेट झाली असं ट्वीट करणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत बसत नाही. जनतेने त्यांची दखल घेतली नाही तर माझ्यासारख्या मंत्र्यांनी का घ्यावी? ज्याला गुप्त बैठक करायची आहे तो रत्नागिरी मतदारसंघात का करेल? रत्नागिरीच्या रेस्ट हाऊसमध्ये का करेल? 200 माणसांच्या समोर का करेल? गुप्त बैठक करायची असेल तर नागपूर, मुंबई, दिल्ली, चेन्नई या ठिकाणी करेल. असे ट्वीट करुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माझ्यावरील विश्वास उडेल असं जर त्यांना वाटत असेल तर हा बालिशपणा आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोलणं मी सहसा टाळतो."



देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीबाबत अधिक सांगताना उदय सामंत म्हणाले की, "ही घटना सहा दिवसांपूर्वी घटली आहे. मी रत्नागिरी- सिंधुदुर्ग दौऱ्यावर होतो. रत्नागिरी विश्रामगृहावर एक वाजता पोहोचलो होतो. त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तिथे आले. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, त्याचं पालन करणं मी कर्तव्य समजतो. आपल्यापेक्षा सीनियर व्यक्ती, माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता समोर येतो, तेव्हा स्वागत असल्याचं सांगण्याची पद्धत असते. सदिच्छा म्हणून मी स्वागत केलं असेल तर मी कोणतंही पाप केलेलं नाही. मी एकटा-दुकटा कोणाला भेटलेलो नाही. ज्यांनी आरोप केला, ते प्रचंड मागे होते. त्यामुळे कदाचित दिसण्यात फरक पडू शकतो. फडणवीस माझ्या मतदारसंघात आल्यानंतर आणि मी सुरुवातीला विश्रामगृहात होतो म्हणून त्यांना हाय-बाय करण्यासाठी भेटलो असेन तर मी गुन्हा केला असं मला वाटत नाही. 


बैठक बंद खोलीत नाहीत, दाराआड झाली नाही, कुठेच झाली नाही, समोरासमोर झाली. त्यावेळी आरोप करणारे माझ्यासमोरच बसले होते. जी चर्चा झाली ती स्वागताच्या दृष्टीने झाली आणि सगळ्यांच्या समोर झाली. त्यावेळी शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी होते. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा माझ्यावर विश्वास आहे. असे ट्वीट करुन माझं राजकीय करिअर थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते थांबणार नाही, असंही उदय सामंत यांनी नमूद केलं.


ऑपरेशन लोटसकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही
ऑपरेशन लोटस होणार नाही. भविष्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. आमची महाविकास आघाडी मजबूत आहे. त्यामुळे ऑपरेशन लोटस गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता नाही.


फडणवीस आणि दरेकरांना सल्ला आहे की... : उदय सामंत
देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांना मित्र सल्ला द्यायचा आहे की, अशा पद्धतीने राजकीय संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बरोबर ठेवणार असू तर भविष्यातील महाराष्ट्राचा राजकारण काय असू शकतं याची प्रचिती आजच्या ट्वीटवरुन कदाचित आली असेल. 


निलेश राणे काय म्हणाले होते?
माजी खासदार निलेश राणे यांनीच सामंत-फडणवीस भेट झाल्याचा गौप्यस्फोट केला. "तोक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही पालकमंत्री उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत गेले होते. या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली," असा निलेश राणे यांनी सांगितलं.