मुंबई : आज माध्यमांशी बोलताना राज्यातील आरोग्य यंत्रणेच्यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्र सरकारनं लसीच्या आयातीसाठी धोरण ठरवावं, असं आरोग्यमंत्री बोलताना म्हणाले. त्याचप्रमाणे आशा वर्कर्सना यापुढे कोरोना चाचणी करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. याशिवाय राज्यातील सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्यास प्राधान्य देणार असल्याचंही ते म्हणाले. राज्यातील म्युकर मायकोसिस (Mucormycosis)च्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात मंत्रालयात महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत सरकारकडून या आजाराबाबत उपाययोजनांची चर्चा करण्यात आली.
आरोग्यमंत्री बोलताना म्हणाले की, "उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकारी यांची बैठक झाली. राज्यात म्युकर माकोसिसचे एकूण 2245 रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने याला नोटीफाईड आजार घोषित केलं आहे. म्हणजे, प्रत्येक रुग्णाची नोंद केली जाणार. रुग्ण आणि त्यांच्याबाबतची माहिती शासनाला देणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे या रुग्णांची माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. म्युकर मायकोसिसच्या आजारासाठी लागणारं एम्फोटेरेसिन इंजेक्शनचं नियंत्रण केंद्र सरकारनं केलेलं आहे. केंद्र सरकार आपल्याला जेवढा कोटा देईल त्याप्रमाणे आपण प्रत्येक जिल्ह्यात त्याचे वाटप करतो." पुढे बोलाताना ते म्हणाले की, "महात्मा फुले जन आरोग्य योजनेत म्युकर मायकोसिस आजाराचे उपचार मोफत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी बजेटमधून 30 कोटी रुपयांच्या निधीचीही तरतूद करण्यात आला आहे. या आजारावरील उपचारांसाठी 131 रुग्णालयं नोटीफाइड केलेली आहेत. 2200 पैकी 1007 रुग्ण महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर मोफत उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे या आजारावर उपचार खाजगी रुग्णालयात मोफत किंवा कमी दरात करण्याचे प्रयत्नही सुरु आहेत."
पाहा व्हिडीओ : एम्फोटेरेसीन-बी औषधासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे आदेश : आरोग्यमंत्री राजेश टोपे PC
आरोग्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं की, "राज्याला ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून Amphotericin-B इंजेक्शनच्या 60 हजार व्हाईल्स 1 जून रोजी राज्याला उपलब्ध होणार आहेत. म्युकर मायकोसिसबाबत आम्ही जागरूक आहोत. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, प्रसार होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना मास्क न लावणाऱ्यांकडून आकारण्यात आलेला दंड आणि इतर माध्यमातून उपलब्ध झालेले पैसे म्युकर मायकोसिसच्या जनजागृतीसाठी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत."
राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत बोलातान आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, "राज्यातील आजची कोरोना स्थिती 3 लाख 27 हजार आहे. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे, कोरोनाचा रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट 12 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर मृत्यूदर 1.5 टक्के आहे. सध्याच्या स्थितीला राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट एकूण राज्याच्या सरासरी पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा जास्त आहे, त्यांना दोन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्या जिल्ह्यांत होम आयसोलेशन बंद करुन कोविड सेंटर वाढवा आणि तिथे रुग्णांना आयसोलेट करा. त्यासाठी अतिरिक्त कोविड सेंटर उभारले जाणार आहेत." तसेच राज्यातील सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्यास प्राधान्य देणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
लसीकरणाबाबत बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले की, "कोणत्याच राज्यांना लसींच्या ग्लोबल टेंडरसाठीचा कोणताही प्रतिसाद अद्याप मिळाला. केंद्र सरकारने लसीकरणासाठी राष्ट्रीय धोरण जाहीर करावं. 18 चे 44 वर्षे वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी जर केंद्रानं राज्यांकडे सोपवली असेल तर त्यासाठी लागणारे पैसे आम्ही देतो. केंद्राने लसी आयात करावी आणि ती राज्याला पुरवावी."