नवी दिल्ली : मुंबईच्या वडापाववर दिल्लीकरांचा जरा जास्तच जीव असल्याचं दिसतं आहे. कारण आज वर्ल्ड वडापाव दिनाच्या निमित्ताने राजधानीत एक अनोखा विक्रम पार पडला. तब्बल 144 फूट लांबीच्या या वडापावची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्याबाहेरही वडापावची क्रेझ खाद्यप्रेमींमध्ये किती वाढत चालली आहे, हे यानिमित्तानं पाहायला मिळालं.
दिल्लीत जगातला सर्वात लांब वडापाव तयार करण्यात आला. एक दोन नव्हे, तर तब्बल 144 फूट लांब.... वडापाव म्हटल्यावर या विक्रमाची तयारी महाराष्ट्रात सुरु आहे, असं तुम्हाला वाटेल. पण या गैरसमजात राहू नका. कारण वडापावचा हा अनोखा विक्रम केलाय दिल्लीकरांनी.
नुक्कडवाला या दिल्लीतल्या फूडचेननं जागतिक वडापाव दिनानिमित्त हा अनोखा सोहळा आयोजित केला होता. मुंबईच्या चमचमीत, टेस्टी वडापावनं दिल्लीकरांनाही भुरळ घातली आहे.
23 ऑगस्ट 2001 ला धीरज गुप्ता या व्यक्तीनं वडापावला इंडियन बर्गरचं रुप देत, जंबो वडापाव फूड चेन सुरु केली. त्यानिमित्तानंच त्यांच्या 9 शहरातल्या शाखा हा जागतिक वडापाव दिन साजरा करतात. इतरांनीही त्यांचं अनुकरण करायला सुरुवात केली आहे.
वडापाव हे खरंतर सामान्यांचं फूड. मुंबईत गिरणी कामगारांच्या संस्कृतीत हे पटकन रुजलं. खायला काही प्लेट लागत नाही ना चमचा. जितकं लवकर बनतो, तितक्याच लवकर खाल्लाही जातो. त्यामुळेच मुंबईच्या कामगार संस्कृतीची तो ओळख बनला. आज मुंबईत दिवसाला जवळपास 18 ते 20 लाख वडापाव खपतात.
वडापावला आपण मराठी माणसं खूपच लाईटली घेतो. पण त्याचं महत्व महाराष्ट्राच्या बाहेर आल्यावर कळतं. या महोत्सवात गर्दी केलेल्या दिल्लीकरांना विचारा ते किती मिस करतात आपला वडापाव.
अशा पद्धतीनं वडापाव दिन दिल्लीत साजरा झाला...निमित्त काहीही असेना, पण त्यानिमित्तानं महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती बाहेर पोहचते आहे. वडापावची दखल बड्या बड्या कॉर्र्पोरेट जायंटसनाही घ्यावीशी वाटते आहे, हे जास्त महत्वाचं आहे.