WHO :  जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार (World Health Organization Report) भारतात सर्वत्र सुरक्षितपणे व्यवस्थापित पेयजल पुरवठा केल्यास अतिसाराच्या आजारांमुळे होणारे सुमारे चार लाख मृत्यू टाळता येतील. तसेच खर्चात अंदाजे  8.2 लाख कोटी रुपयांपर्यंत बचत होईल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आलाय. ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींना आपला बराचसा वेळ आणि ऊर्जा दैनंदिन वापरासाठीचे  पाणी आणण्यात खर्च करावी लागते. परिणामी उत्पन्न कमावण्याच्या संधींमध्ये महिलांचा सहभाग कमी होतो, तर मुलींचा शालेय जीवनातील वेळ वाया जातो. तसेच त्यांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतात, असं या अहवाल सांगण्यात आलं आहे. 


नळाद्वारे पाणी पुरवठा झाल्यास वेळेत बचत होईल


घराच्या परिसरातच पेयजलाची उपलब्धता निश्चित केल्यास ग्रामीण भागातील लोकांची  विशेषतः महिलांचे आरोग्य आणि त्यांचे सामाजिक आर्थिक जीवनमानात सुधारणा होईल. ग्रामीण स्त्रिया आणि मुलींचे श्रम कमी होतील. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी पुरवठा झाल्यास पाणी भरण्यासाठी लागणाऱ्या वेळेत (दररोज 5.5 कोटी तास),विशेषतः महिलांच्या वेळेत बचत होईल असे  जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये (एस डी जी) 6.1 मध्ये  2030 पर्यंत सर्वांसाठी सुरक्षित आणि परवडणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा सार्वत्रिक आणि न्याय्य पद्धतीने पुरवठा होण्यासाठीचे लक्ष्य निश्चित केले आहे. 


देशातील 12.7 कोटी ग्रामीण कुटुंबांसाठी नळाद्वारे पाण्याची व्यवस्था


भारत सरकारने राज्ये, केंद्रशासित प्रदेशांसमवेत भागीदारीच्या तत्वावर जल जीवन मिशनद्वारे राबवण्यात आलेल्या हर घर जल योजनेची अंमलबजावणी केली आहे. त्याद्वारे 2024 पर्यंत देशातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पेयजल पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. ही मुदत पिण्याच्या पाण्याच्या सेवांसाठी शाश्वत विकास लक्ष्य (एस डी जी) 6.1 ने निश्चित केलेल्या वर्ष 2030 पेक्षा खूप आधीची असून - त्यामुळे एस डी जी 6.1 च्या यशावर सकारात्मक प्रभाव पडतो. दरम्यान, आत्तापर्यंत देशातील 19.4 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी 12.7 कोटी (65.5%) ग्रामीण कुटुंबांसाठी नळाद्वारे पाण्याची तरतूद करण्यात आल्याची माहिती जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी राज्यसभेत दिली.


हर घर नळ योजनेचे उद्दिष्ट देशातील प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आहे. सन 2024 पर्यंत या योजनेद्वारे प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची जोडणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आता देशातील कोणत्याही नागरिकाला पिण्याच्या पाण्यासाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही.





 




महत्त्वाच्या बातम्या:


Jal Jeevan Mission :  'हर घर जल' योजना प्रमाणपत्र मिळवणारं गोवा देशातील पहिले राज्य, 2.63 लाख ग्रामीण घरांपर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा