8th August Headline :  विरोधी पक्षाकडून केंद्र सराकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावावर लोकसभेत आज चर्चा होणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील खासदारांची बैठक पार पडणार आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. तसेच विंडीज आणि भारत यांच्यामधील तिसरा टी - 20 सामना हा खेळवण्यात येणार आहे. 


अविश्वासाच्या प्रस्तावावर लोकसभेत होणार चर्चा


मोदी सरकारच्या विरोधात आणण्यात आलेल्या अविश्वासाच्या प्रस्तावावर लोकसभेत आज लोकसभेत चर्चा होणार आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल केल्यानंतर त्यांनी सोमवारी अधिवेशनात सहभाग घेतला. लोकसभेत सादर होणाऱ्या अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी चर्चेला सुरुवात करणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी हे त्यांच्या भाषणात कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महाराष्ट्र आणि गोव्यातील खासदारांची बैठक


दिल्लीमध्ये आज महाराष्ट्र सदनात संध्याकाळी 7 वाजता एनडीएच्या खासदारांची बैठक होणार आहे. यामध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या खासदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदारांना मार्गदर्शन करणार असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील तयारीचा आढावा घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


संसदेच्या परिसरात युवक काँग्रेसचं आंदोलन 


संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. संसदेच्या परिसरात युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येणार आहे. वाढता द्वेष, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर युवक काँग्रेसकडून सरकारच्या विरोधात आंदोलन केले जाणार आहे. 


मणिपूरच्या आदिवासी संघेटनेचे प्रतिनिधी घेणार अमित शाह यांची भेट


मणिपूरच्या आदिवासी संघेटनेचे प्रतिनिधी आज दिल्लीत जाणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. मणिपूरच्या हिंसाचारामध्ये कुकी-जो समाजातील जे व्यक्ती मारले गेले आहेत त्यांच्या  सामूहिक दफनविधीसह पाच प्रमुख मागण्यांवर विचार करण्याची विनंती करण्यात येणार आहे. 


आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक


आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. मागील दोन महिन्यात महागाईत झालेली वाढ, भाजीपाला, डाळींच्या किंमतीत झालेली वाढ आणि अमेरीकेच्या फेडरल रिझर्व्हकडून पुन्हा एकदा व्याजदर वाढविण्याचा  निर्णय घेण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पतधोरण समिती व्याजदर वाढीसंदर्भात काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ


 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सावंतवाडी, कुडाळ आणि ओरोससह कोकणातल्या 12 रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात येणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावरून या कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थिती राहणार आहेत. 


भारत आणि विंडीजमध्ये तिसरा टी 20 सामना 


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज खेळवला जाणार आहे. नॅशनल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामना सुरू होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धचा सलग तिसरा पराभव आणि मालिका गमावू नये यासाठी भारतीय संघाला आज कोणत्याही स्थितीत सामना जिंकावा लागणार आहे.