जोरहाट (आसाम): जादव पायेंग, वय वर्ष ५६,  १९७९ सालापासून आयुष्य एकाच कामाला वाहून घेतलेलं, झाडं लावायची आणि धरतीला हिरवं करायचं. ध्यास असा की, एक एक झाड स्वत:च्या हाताने लावत, आज ब्रह्मपुत्रेच्या एका बेटावर तब्बल १२५०(साडेबाराशे) एकरवर  'मुलाई कथोनी' हे जंगलच उभं केलं आहे. मुलाई हे जादव यांचं टोपण नाव तर कथोनी म्हणजे जंगल.


मुलाई कथोनी या त्यांच्या जंगलात  बांबू, साग, काटेसावर, सुबाभुळ, कदंब, ऐन, अर्जून, कपोक, शेवरी अशी ११० प्रकारची वेगवेगळी औषधी झाडं आहेत. जवळच्या काझीरंगा अभयारण्यातून गेंडे, तर शेजारच्या अरुणाचलमधून हत्ती ३ ते ४ महिने मुक्कामी येतात. अस्वल, हरणं, गवे आहेत, अगदी रॉयल बेंगाल टायगर म्हणजे पट्टेरी वाघही आहेत.

चिमण्यांपासून गिधाडांपर्यंत वेगवेगळ्या पक्षांनी मुलाई कथोनीला आपलं घर मानलंय.

वनपुरुष अशी ओळख

7 वर्षांपूर्वीपर्यंत हे नाव कोणालाही माहिती नव्हतं. आज जादव पायेंग यांना वनपुरुष ही नवी ओळख मिळाली आहे.

जादव पायेंग यांचं हे बेटावरचं जग बाहेरच्या जगाला कळायला तशी तब्बल ३० वर्ष लागली. पत्रकार आणि हौशी फोटोग्राफर असलेल्या जितू कलिता यांच्यामुळे या जंगलाची.. हे जंगल वसवणाऱ्या जादव पायेंग यांची माहिती अगदी योगायोगाने समोर आली.

बांबूच्या घरात वास्तव्य

आसामची सांस्कृतिक राजधानी जोरहाटपासून 25 किलोमीटर अंतरावर कोकिलामुख परिसरात, टिपीकल बांबूच्या घरात जादव पायेंग राहतात. घराकडे जायचा रस्ताही अत्यंत खराब. संथ भासणारी, इथे दुभंगत पुढे पुन्हा जुळून येणारी ब्रम्हपुत्रा इथनं हाकेच्या अंतरावर.

निसर्ग आपल्याला भरभरुन देतो, आपण निसर्गाला काय देतो? या प्रश्नातून जादव पायेंग यांच्या थक्क करणाऱ्या प्रवासाला सुरुवात झाली.

ब्रह्मपुत्रेचं रौद्ररुप जादव यांनी लहानपणी पाहिलं होतं, त्या महापुरानं या बेटावर एक झाडंही शिल्लक ठेवलं नव्हतं, थोडीशीही सावली न मिळाल्यानं शेकडो साप वाळूत तडफ़डून मेले. झाडं नसतील तर आपली- माणसाची अवस्थाही अशीच होईल का या चिंतेनं १६-१७ वर्षाचे जादव पायेंग अस्वस्थ झाले. गावातल्या वडिलधाऱ्यांनी हसू लपवत त्यांना झाडं लावायचा सल्ला दिला, काहींनी बांबूची रोपंही दिली. तो सल्ला खूपच मनावर घेत जादव पायेंग यांनी बेटावर झाडं लावणं सुरु केलं ते काम आजतागायत सुरुच आहे.

दररोज नाव वल्हवत जायचं, झाडं लावायची
गेली ३५ वर्ष हा माणूस रोज अक्षरशहा वेड्यासारखं काम करतोय... पहाटे 3.30 वाजता उठायचं, नाव वल्हवत नदी पार करायची, बेटावर जायचं, मिळतील तिथनं बी, रोपं गोळा करायची, वाळूच्या बेटावर खड्डे खणायचे आणि ती रोपं लावायची, वाढवायची... ऊन वारा पाऊस काहीही असलं तरी जादव पायेंग आपली ही नाव काढतात आणि पलिकडच्या बेटावर जाऊन बी- रोपं लावण्याचं काम करतात.

उत्पन्नाचा स्त्रोत 
नावेतून पैलतीरावर पोचायला अर्धातास लागतो, नंतर अरुणा सापोरी बेट, ते ओलांडून बाहेर अर्धा तास म्हणजे साधारण 5-7 किलोमीटर चालल्यानंतर जादव यांचा गोठा लागतो.. वराहपालन आणि ५०-६० गायी, हाच जादव यांच्यासहीत बेटावरील प्रत्येकाचाच उत्पन्नाचा मार्ग.

गोठ्याच्या जवळच कुंपण घालून भाजीपाला लावलेला आहे, गायीच्या दुधापासून ते भात, भाजीपर्यंत सगळ्या गोष्टी १०० टक्के सेंद्रीय, विषमुक्त. त्यांच्या मुलाई कथोनी जंगलात असलेल्या प्रत्येक झाडांची वेगळी कहाणी आहे.

झाडं कापण्याआधी मला कापा
सुरुवातीच्या काळात त्यांच्या या जंगलात आलेल्या हत्तींनी गावात धुडगूस घातला, घरं उध्वस्त  केली त्यामुळे नाराज गावकरी जादव पायेंग यांना मारायला, झाडं तोडायला सरसावले पण झाडं  कापण्याच्या आधी मला मारा असा पवित्रा जादव पायेंग यांनी घेतल्याने गावकरी शांत झाले.

हत्तींना त्यांचं आवडतं खाद्य मिळावं आणि ते जंगलातच रहावेत असा जादव पायेंग यांचा साधा आणि सोपा विचार. जंगल उभारणीच्या या काळात जादव पायेंग यांनी एकही रोपं वाया घालवलं नाही.

दशकांपूर्वीच्या पुरात ओंडक्यासोबत एक छोटंसं रोपटं वाहत आलं, ते रोपटं अलगद काढून घेत जादव पायेंग यांनी इथे लावलं. आज त्याचं डेरेदार वृक्षात रुपांतर झालं आहे.

लवकर येणारी झाडं लावली
लवकर लवकर येणारी झाडं लावायची, लवकर वाढवायची, हे एकच चक्र जादव यांच्या डोक्यात सतत सुरु असतं. पुराच्या काळात पशुपक्षांना आधार ठरणाऱ्या मोठ्या वारुळातल्या झाडाचा किस्साही भन्नाट आहे. वाळवीपासून हे झाड वाचवण्यासाठी त्यांनी गावातून मोठ्या लाल मुंग्या आणल्या होत्या.

'जीवो जीवस्य जीवनम्'
'जीवो जीवस्य जीवनम्' अशी एक परिपूर्ण इकोसिस्टिम म्हणजेच परिसंस्था मुलाई कथोनी इथे  पाहायला मिळते. त्यात माणसाची लुडबूड जादव यांना खटकते. सुरुवातीच्या काळात शिकाऱ्यांनी मारलेल्या गेंडंयाचे अवशेष आजही मुलाई कथोनीमध्ये आहेत. त्यामुळेच पृथ्वीला सर्वात मोठा धोका माणसांपासून आहे असं जादव पायेंग यांचं ठाम मत.

वाघ, हत्ती जिथे तळ ठोकायचे ती जागा ते आपल्याला दाखवतात आणि वाघासोबत झालेल्या भेटीचा किस्साही ऐकवतात. वाघाने आत्तापर्यंत त्यांच्या 60-70 गायी म्हशींचा फडशा पाडलाय पण त्याची तक्रार जादव पायेंग करत नाहीत.

जंगल उभारण्याचं श्रेय स्वत:कडे नाही
या 1250 एकर जंगलाचं श्रेय ते एकट्याकडे घेत नाहीत, त्या कामात पक्षांचा, वाऱ्याचा, निसर्गाच्या प्रत्येक घटकाचा बरोबरीचा वाटा आहे असं ते मोठ्या मनाने मान्य करतात.

पृथ्वीला हवामान बदलापासून वाचवायचं असेल तर आपण झाडं लावायला हवीत असं जादव पायेंग सांगतात. आहे ते टिकवण्याचं काम युवा पिढी करेल असा विश्वासही त्यांना वाटतो. त्यासाठी शाळेत पर्यावरण शिक्षण अनिवार्य करण्याचा सल्ला ते देतात. प्रत्येक विद्यार्थ्याने दोन झाडं लावली तरी पृथ्वी हिरवी बनेल असा त्यांना विश्वास वाटतो.

'मेकाही' बेटाचा शोध
मुलाई कथोनीच्या पुढे ब्रह्मपुत्रेचा आणखी एक प्रवाह पार करत जादव पायेंग यांनी आणखी एक  'मेकाही' नावाचं बेट शोधून काढलंय. गेली 6 वर्ष त्या दीड ते दोन हजार एकरवरच्या मेकाही बेटावर झाडं लावायचं त्यांचं आवडतं काम सुरु आहे.

येत्या काही वर्षात त्या वाळूच्या बेटावरही मुलाई कथोनी सारखं मोठं जंगल उभा करायचा चंग या झाडं लावणाऱ्या माणसांनं बांधलाय. जादव पायेंग यांचं काम पाहायला अनेक लोक बेटावर येतात, काही त्यापासून प्रेरणा घेऊन जातात. 30 वर्षानंतर का असेना केलेलं काम लोकापर्यंत पोहोचतंय याचं समाधान जादव पायेंग यांना वाटतं. जगभरात त्यांच्या कामाचं कौतुक होतंय.

फॉरेस्ट मॅन 
फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया अशी आंतरराष्ट्रीय ओळखही त्यांना मिळाली आहे. राज्यातील देशातील अनेक पुरस्कार त्यांना मिळू लागले आहेत. पण कोणत्याही पुरस्कारापेक्षा झाडं लावण्याचं काम त्यांना जास्त महत्वाचं वाटतं.

मेरा घर बडा है साडेबारासो एकर का है तुम्हारा घर कितना बडा है” असं ते विचारतात तेंव्हा आपलीच किव वाटते.

एकिकडे झाडांची कत्तल करुन सिमेंटची जंगल उभी राहात आहेत, तर दुसरीकडे वाळूच्या बेटावर झाडं लावून खरंखुरं जंगल वसवण्याचं काम वनपुरुष जादव पायेंग करतायत. फक्त आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार करणाऱ्यांच्या भाऊगर्दीत पक्ष्यांची, प्राण्यांची, पृथ्वीची चिंता करणारे जादव पायेंग वेगळे ठरतात. वनराजींनी नटलेल्या धरित्रीचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं स्वप्न ते पाहात आहेत, त्यासाठी झटत आहेत, त्यामुळेच जादव पायेंग हेच आपले खरे हिरो आहेत. हेच आपले खरे महानायक आहेत.

संदीप रामदासी, एबीपी माझा, जोरहाट (आसाम)

VIDEO: