मुंबई : वर्ल्ड बँकेकडून मुंबई लोकलला आर्थिक सहकार्य करणार आहे. त्यामुळे मुंबईतील लोकल सेवा कशी आहे, ते पाहण्यासाठी थेट वर्ल्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांनी लोकलमधून प्रवास केला. चर्चगेट ते दादरचा प्रवास त्यांनी लोकलने केला.
जॉर्जिया यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. मुंबईनंतर त्या अर्थमंत्री अरुण जेटलींसह महत्वाच्या अधिकाऱ्यांनाही भेटणार आहेत.
''विकास कसा करायचा भारताकडून शिका''
भारत वर्ल्ड बँकेचा सर्वात मोठा ग्राहक आहे. भारताच्या आर्थिक विकासाचा जागितक पातळीवर परिणाम जाणवतो. भारताच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीने जागतिक पातळीवरील शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी मदत केली आहे. नवनवीन मार्गाने विकास कसा साधावा, हे जगाला शिकण्यासाठी भारत एक प्रयोगशाळा आहे. हीच पद्धत जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असं जॉर्जिया म्हणाल्या.
जॉर्जिया मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्याशीही चर्चा करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आपण अर्थसहाय्य करत असलेली मुंबईची लोकल सेवा कशी आहे, त्याचा अनुभव घेतला. मुंबई लोकल ही सर्वात वेगाने वाढणारी सेवा असून भारताच्या शहरीकरणाला वेग देणारी असल्याचं वर्ल्ड बँकेने पत्रकात म्हटलं आहे.