नवी दिल्ली: बँकिंग क्षेत्रातील 9 कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधी संस्था, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने आज संपूर्ण देशभरात बँकांचा एकदिवसीय संप पुकारला आहे. सरकारच्या बँक सुधारणा धोरणाविरोधात आणि नोटाबंदीच्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला मिळावा, म्हणून हा संप पुकारण्यात आलाय. यामुळे देशभरातील जवळपास 1 लाख 25 हजार बँक शाखा आज बंद राहणार आहेत.


या संपामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल, बँक ऑफ बडोदासह इतर बँका सहभागी होणार आहेत. यासाठी या बँकांनी आपल्या ग्राहकांना याबाबतची सूचना दिली आहे.

तर दुसरीकडे युनियन नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स यांनी या संपामध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. या संघटनांनी या संपामागे राजकीय उद्देश असल्याचं म्हणलं आहे. त्यामुळे हा संप यूएफबीयूने पुकारलेला संप म्हणणं चुकीचं असल्याचंही, या दोन्ही संघटनांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या : तीन दिवसांच्या सलग सुट्ट्यानंतर मंगळवारी पुन्हा बँका बंद?