मुंबई : कोरोना महामारीमुळे सर्वांना नाईलाजाने आपल्या घरातच रहावे लागत आहे. त्यामुळे कामाची वर्क फ्रॉम होम ही पद्धत सुरु झाली. अशा परिस्थितीत महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी घरून काम सुरु केले. आता घरून काम करणाऱ्या लोकांना जवळपास दीड वर्षे झाली आहेत. पण आता अनेकांना घरून काम करण्याऐवजी कार्यालयात काम करायची इच्छा आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून हे उघड झाले आहे. प्रॉपर्टी कन्सल्टन्ट कंपनी JJL इंडियाने केलेल्या या सर्वेक्षणानुसार, 75% लोकांनी सांगितले की आता त्यांना कार्यालयात जाऊन काम करायचे आहे. यासह, त्यांनी असेही म्हटले की कंपन्यांनी आता घर आणि ऑफिस दोन्हीमधून काम केले पाहिजे. विविध ऑफिसेसच्या 300 कर्मचाऱ्यांचा या सर्वेक्षणात समावेश होता. 


या सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की घरून काम केल्याने चांगले परिणाम मिळतात असे मानणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाली आहे. यासह, अनेकांचं म्हणण आहे की कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण द्यावे, ही त्यांची देण्याची जबाबदारी आहे. जेणेकरून ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील.


गेल्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणानुसार 52 टक्के लोकांचा वाटत होते की त्यांना कार्यालयात जाऊन काम करायचे आहे, परंतु या वर्षी केलेल्या सर्वेक्षणात अशा लोकांची संख्या 75 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षी, 92 टक्के लोकांना असं वाटत होतं की त्यांना घर आणि कार्यालय या दोन्ही ठिकाणी काम करण्याचा पर्याय मिळाला पाहिजे. तर या वर्षीच्या सर्वेक्षणात 89 टक्के लोकांना असं वाटत आहे.


यासोबत 62 टक्के लोकांनी घर आणि कार्यालय सोडून तिसऱ्या स्थानावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या सर्वेक्षणात, 91 टक्के लोकांना वाटतं की त्यांना स्वतःच्या सोयीनुसार वेळ निवडता आली पाहिजे. तर 86 टक्के लोकांनी आठवड्यातून चार दिवस काम करण्याची मागणी केली आहे.


गेल्या वर्षी, 80 टक्के लोकांना वाटत होतं की ते घरी राहून चांगले काम करू शकतात. परंतु या वर्षीच्या सर्वेक्षणात अशा लोकांची संख्या 67 टक्क्यांवर आली आहे. गेल्या वर्षी 92 टक्के लोक त्यांच्या कामावर समाधानी होते. तर या वर्षी सर्वेमध्ये अशा लोकांची संख्या 85 टक्क्यांवर आली आहे.