भोपाळ : समान वेतनाच्या मागणीसाठी मध्य प्रदेशमधील महिला शिक्षिकांनी सामूहिक मुंडन करत, सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी जवळपास शंभर महिला शिक्षिकांनी स्वत:चं सामूहिक मुंडन करुन घेतलं.


मध्य प्रदेशमधील महिला शिक्षकांनी समान काम आणि समान वेतन या मागणीसाठी ‘अध्यापक अधिकार यात्रा’ काढली आहे. ही यात्रा शुक्रवारी विदिशामध्ये पोहोचली. शहराच्या मुख्य रस्त्यावरुन रॅली काढत, सरकारविरोधातील आपला रोष शिक्षिकांनी व्यक्त केला.


मीडिया रिपोर्टनुसार, भोपाळमधील या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येमध्ये महिला शिक्षिका सहभागी झाले होते. यावेळी जवळपास शंभर महिला शिक्षिकांनी स्वत:चं मुंडन करुन घेत, सरकारच्या धोरणांवर निषेध केला. शिक्षकांचं हे आंदोलन आझाद अध्यापक संघाच्या बॅनरखाली करण्यात आलं.

दरम्यान, मध्य प्रदेश शिक्षक संघाने पाच दिवसांपूर्वीच राज्य सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अल्टिमेटम दिलं होतं. यात मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर सामुहिक मुंडन करण्याचा इशाराही यावेळी संघाने दिला होता. त्यानुसार आज शनिवारी महिलांनी सामूहिक मुंडन करत सरकारचा निषेध केला.