या दोन्ही तरुणींचे कॉलेज जीवनापासून प्रेम संबंध होते. दोघींनी लग्नाच्या आणा-भाकाही घेतल्या होत्या. त्यानुसार, 16 एप्रिल रोजी एका सामुदायिक विवाह सोहळ्यात दोन्ही तरुणींनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं.
लग्नासाठी या दोघींपैकी एकीने आपलं नाव सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह इच्छूक ‘वर’ म्हणून नोंदवलं. तर दुसरीने ‘वधू’ म्हणून नाव नोंदवलं. विशेष म्हणजे, सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आयोजकांना संशय येऊ नये, म्हणून दोघींनीह पालकांना भाड्यावर आणलं होतं. लग्नानंतर दोघींनी एकच खोली घेतली, पण दोघीही वेगवेगळ्या राहात होत्या.
त्यातच दोघींमधील एक मुलगी अचानक गायब झाल्याने, कुटुबीय हैराण झाले होते. त्यांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. या शोध मोहिमेत मुलीच्या कुटुंबियांना जी माहिती मिळाली, ती ऐकून त्यांना धक्काच बसला. दोघींपैकी एकीने मुलगा बनून मुलीशीच लग्न केल्याचं कुटुबियांना समजलं. यानंतर दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी एकच गोंधळ घातला.
दोघींच्या कुटुंबियांनी आपापल्या मुलींना समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण दोघींनीही विभक्त होण्यास नकार दिला. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी पोलिसांची मदत घेतली. पण तरीही मुलींनी स्पष्ट नकार देत, एकत्र राहण्याच्या निर्णयावर ठाम भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांना काय कारवाई करावी? हेच समजत नव्हते.