गाझियाबाद : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. आगामी 50 वर्षात सत्तेत राहण्याचं स्वप्न पाहा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
अमित शाह म्हणाले की , "निवडणुकीतील विजयाची कल्पना ही केवळ पाच वर्ष, दहा वर्ष, 15 वर्ष करु नका. तर ज्या प्रमाणे काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रदीर्घकाळ ग्रामपंचायत ते पार्लिमेंटचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून राज्य केले. त्याच प्रमाणे 50 वर्ष सत्तेत राहण्याचा संकल्प करा."
ते पुढे म्हणाले की, "केवळ निवडणुकीत विजय मिळवणं, इतकंच आपलं लक्ष्य असून उपयोग नाही. तर विकासाच्या प्रक्रियेत शेवटच्या घटकापर्यंत काम पोहोचलं पाहिजे. गेल्या चार वर्षात मोदी सरकारने एकही काम असे केलं नाही, ज्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना अपमान सहन करावा लागेल. सरकारच्या कामामुळे कार्यकर्ते ताठ मान करुन जनतेत जात आहेत."
सर्जिकल स्ट्राईकबाबत बोलताना अमित शाह म्हणाले की, "आम्हाला देशात शांतता हवी आहे. त्यासाठी देशाच्या सीमा बळकट करणं, यावर आमचा विशेष भर आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर जगातील इतर देशांचा भारताकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला आहे."
स्वच्छ भारत अभियानाबाबत बोलताना अमित शाह म्हणाले की, "स्वच्छ भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक गावात शौचालये बांधण्याचा संकल्प केला आहे. पण काँग्रेस त्याची खिल्ली उडवत आहेत. पण तरीही मोदी सरकारने देशभरात 7.5 कोटी पेक्षा जास्त शौचालये बांधून महिलांना सन्माने जगण्याचा अधिकार दिला."
दरम्यान, अमित शाहांच्या वक्तव्याचा काँग्रेसने चांगलाच समाचार घेतला. अमित शाह हे अतिशय घाबरलेले सेनापती असल्याचं सांगत, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर तोंडसुख घेतलं आहे.
सुरजेवाला म्हणाले की, "अहंकाराने मदमस्त झालेले अमित शाह हे विसरत आहेत की, हा देश लोकशाही व्यवस्था मानणारा आहे. तुम्हाला जनतेने पाच वर्षांसाठी निवडणून दिलं आहे, 50 वर्षांसाठी नाही. जर तुम्हाला लोकशाही संपवायची असेल, तर ती संपवता येणार नाही. या देशातील जनताच निर्णय करेल की, पुढची पाच वर्ष कुणाच्या हातात सत्ता द्यायची. जनमत बदलत आहे. मतदार त्यांना घरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे घाबरलेले अध्यक्ष लोकशाहीविरोधी वक्तव्य करत आहेत."