मुंबई : एअर इंडियाचं अमृतसर-दिल्ली विमान हवेत असतानाच एअर टर्ब्युलन्समुळे मोठा गोंधळ झाला. विमानातील खिडकीचं पॅनल खाली पडल्यामुळे प्रवासी घाबरले, तर डोक्याला दुखापत झाल्याने तीन प्रवासी जखमी झाले.
एअर इंडियाचं AI 462 हे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान गुरुवारी अमृतसरहून दिल्लीला जात होतं. त्यावेळी 10 ते 15 मिनिटं हवेच्या दाबामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. विमानाला काहीसे हादरे बसले. एका प्रवाशाने सीटबेल्ट न लावल्यामुळे त्याचं डोकं लगेज केबिनवर आदळलं.
18 ए सीटवरील विंडो पॅनल खाली पडलं, मात्र खिडकीची काच शाबूत होती. मात्र विमानाला बसलेल्या हादऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे.
'हाय लेव्हल टर्ब्युलन्समुळे ही परिस्थिती निर्माण झाली. एअर इंडिया आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) या प्रकरणाची चौकशी करत आहेत' असं एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.