सिंगरौली : मध्यप्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यामध्ये घोटाळेबाजांनी पैसे लाटण्याची एक अनोखी पद्धत शोधून काढली आहे. पंचायत सचिव रामसुभग सिंह यांनी बिलं पास करण्यासाठी चक्क फोटोशॉपच्या आधारे स्वच्छतागृहात नळ आणि बेसिन बसवल्याचं काम झाल्याचं दाखवलं.


 
मात्र सीईओंना ही फसवणूक लक्षात येताच त्यांचा पारा चांगलाच चढला.रामसुभग यांनी ग्राम पंचायतीच्या स्वच्छतागृहांचं, त्यात वॉश बेसिन आणि नळ बसवल्याचं भासवण्यासाठी फोटोशॉपच्या मदतीने एडिटिंग केलं आणि बिलं पास करुन घेण्यासाठी त्याचे फोटो सादर केले. मात्र जिल्हा पंचायतीच्या सीईओ निधी निवेदिता यांनी ही गोष्ट हेरली. त्यांनी तात्काळ याची खातरजमा करण्यासाठी स्वच्छतागृहाची पडताळणी केली आणि सचिवांचं पितळ उघडं पडलं.

 
काम न झाल्याचं आणि विशेष म्हणजे फसवणूक केल्याचं लक्षात येताच सीईओ मॅडम संतापल्या आणि त्यांनी तत्क्षणी उठाबशा काढण्याची शिक्षा सचिवाला सुनावली. सचिव रामसुभग सिंह यांनीही चूक कबूल करत उठाबशा काढल्या. यावेळी अधिकाऱ्यांसह गावकरीही
उपस्थित होते.

 
ग्राम पंचायतींमधील 16 स्वच्छतागृहांच्या कामासाठी प्रत्येकी 12 हजार रुपयांची कामं प्रस्तावित होती. स्वच्छतागृह बांधली गेली, मात्र त्यात नळ आणि वॉश बेसिन बसवण्यात टाळाटाळ केली. तूर्तास या कामांचं पेमेंट रोखण्यात आलं आहे.