नवी दिल्ली: सरकारने जनतेच्या पैशावर बंदी घालण्याचा अधिकार कोणत्या संविधानानुसार घेतला? असा सवाल काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी राज्यसभेत केला. तसंच गरिबांच्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक का, अशीही विचारणा शर्मा यांनी केली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नोटबंदीच्या निर्णयावरुन काँग्रेसने सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सरकारच्या निर्णयामुळे देशात आर्थिक अराजकता निर्माण झाली असून शेतकरी आणि मजुरांना सर्वाधिक फटका बसल्याचं आनंद शर्मा यांनी म्हटलं.
राज्यसभेत शोकप्रस्ताव झाल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी काँग्रेसच्या खासदारांनी मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला जोरदार विरोध केला.
काळा पैशाला आळा घालण्यासाठी थेट जनतेच्या पैशावर बंदी घालण्याची गरज काय होती, असाही सवाल आनंद शर्मा यांनी केला. तसंच स्टेट बँकेच्या रिपोर्टनुसार, पाचशे-हजाराच्या नोटा रद्द होणार, हे मार्चमध्येच माहित होतं, मग तशी तयारी का केली नाही, अशीही विचारणा आनंद शर्मा यांनी सरकारला केली.
नोटाबंदीच्या बातम्या एप्रिल महिन्यातच छापून आल्या होत्या, त्यामुळे तेव्हापासून किती लोकांनी सोने, विदेशी चलन खरेदी केलं, याची चौकशी व्हावी, अशी मागणी आनंद शर्मा यांनी केली.