नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची किडनी निकामी झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्वत: स्वराज यांनीच ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

"किडनी निकामी झाल्याने मी एम्स रुग्णालयात आहे. सध्या मी डायलिसिसवर आहे. किडनी प्रत्यारोपणसंदर्भातील चाचण्या माझ्यावर उपचार सुरु आहेत. भगवान कृष्णाची कृपा राहू दे" असं ट्विट सुषमा स्वराज यांनी केलं आहे.


सुषमा स्वराज यांच्यावर आठवडाभरापासून एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यामुळे सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीबद्दल विचारण्यात येत होतं. त्यामुळे स्वत: सुषमा स्वराज यांनीच ट्विटरद्वारे याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रात खणखणीत भाषण दिलं होतं. प्रकृती ठिक नसतानाही त्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेला उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरखा फाडला होता.

मात्र महासभेहून परतल्यानंतरही मूत्रपिंडाचा त्रास जाणवत होता.  गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.