बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दिवसेंदिवस वाढतच आहेत. पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना 15 मिनिटं भाषण करण्याची आणि यावेळी पाच वेळा विश्वेश्वरय्या बोलण्याचं आव्हान तर दिलं, पण आता काँग्रेस अध्यक्षांनीही पलटवार केला आहे.


राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला असून ज्यात काही मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींना पाच मिनिटं बोलण्याचं आव्हान दिलं आहे. “प्रिय मोदीजी तुम्ही जास्त बोलता, पण तुमची कामं आणि शब्दांचा ताळमेळ नसतो,” असं राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडीओत लिहिलं आहे.

व्हिडीओत काय म्हटलंय?

राहुल गांधींनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे, कर्नाटकमध्ये भाजपकडून आरोप असलेल्या नेत्यांना उमेदवारी दिल्याने पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे. राहुल यांनी पंतप्रधानांना विचारलं आहे की, “रेड्डी बंधू टोळीला 8 तिकीटं देण्याबाबत पाच मिनिटं बोलणार का?” याचप्रकारे येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवल्याप्रकरणीही प्रश्न उपस्थित केले आहेत. 23 खटले असूनही येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवल्याबाबत पंतप्रधान बोलणार का? अशाच प्रकारे भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या कर्नाटक भाजपच्या टॉप 11 नेत्यांचाही उल्लेख व्हिडीओमध्ये केला आहे.


राहुल गांधींनी कोणत्याही भाषेत, अगदी मातृभाषेत 15 मिनिटं बोलावं : मोदी

राहुल गांधींचं आव्हान

राहुल गांधी यांच्या एका आव्हानानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बोलण्याचं आव्हान देण्याबाबत राजकीय खेळाला सुरुवात झाली. “नीरव मोदी, राफेल डील यांसारख्या मुद्द्यांवर मला 15 मिनिटं बोलू दिलं तर मोदी संसदेत उभं राहू शकणार नाहीत,” असं आव्हान राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी दिलं होतं.

मातृभाषेत 15 मिनिटं बोलावं : मोदी

सुरुवातीला राहुल गांधींच्या या आव्हानाची भाजपच्या नेत्यांनी खिल्ली उडवली होती. पण 1 मे रोजी कर्नाटक निवडणूक प्रचारातील पहिल्या सभेत पंतप्रधान मोदींनीच राहुल गांधींवर हल्लाबोल केला. “राहुल यांनी हातात कागद न घेता कोणत्याही भाषेत 15 मिनिटं सिद्धरामय्या सरकारच्या यशाबाबत बोलावं, वाटल्यास मातृभाषेत बोलावं,” असं खुलं आव्हान मोदींनी दिलं होतं. “तसंच राहुल गांधींनी फक्त पाच वेळा विश्वेश्वरय्या बोलून दाखवावं,” असंही ते म्हणाले होते.

राहुल गांधींची खिल्ली

निवडणूक प्रचारादरम्यान एका सभेत बोलताना राहुल गांधीं महान व्यक्तीमत्त्व मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं नाव उच्चारताना गडबडले होते. राहुल गांधींच्या टंग ट्विस्टरची खिल्ली उडवत, त्यांना पाच वेळा विश्वेश्वरय्या बोलण्याचं आव्हान पंतप्रधानांनी सभेत दिलं होतं.

संसदेत 15 मिनिटं द्या, मोदी उभे राहणार नाहीत : राहुल गांधी

खासगी टीका करणार नाही

मात्र पंतप्रधानांनी माझ्यावर कितीही खासगी टीका झाली, तरी मी त्यांच्यावर उलट खासगी टीका करणार नाही, पण प्रश्न जरुर विचारणार, असं राहुल गांधी म्हणाले होते.