मुंबई : तब्बल 50 दिवसांपासून बंद असलेली हवाई वाहतूक सेवा कधी सुरु होणार याविषयी अजून काही निर्णय झालेला नाही, तरीही लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात देशांतर्गत हवाई वाहतूक सेवा सुरु होऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र त्यामध्ये अनेक निर्बंध असतील असंही सांगितलं जातंय. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर जेव्हा विमानसेवा सुरु होईल, तेव्हा हँड लगेज म्हणजे केबिनमध्ये सोबत घेऊन जाण्याच्या सामानावर निर्बंध असण्याची शक्यता आहे. तसंच अति ज्येष्ठ नागरिक म्हणजेच 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना यापुढे विमान प्रवास करता येणार नाही. तसंच विमान प्रवासात खाण्यापिण्याच्या वस्तूही मिळणार नाहीत, असं सांगितलं जातंय.


अजून विमानप्रवास कधी सुरु होणार याविषयी काहीच स्पष्टता नसल्याने त्याविषयी काय अटी किंवा निर्बंध असतील, याची चर्चा नेटिझन्समध्ये रंगलीय. जो ते आपापल्या परीने त्यात निर्बंध जोडण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करतोय.

विमान वाहतूक क्षेत्रातल्या काही जाणकारांमध्ये मात्र लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात विमान वाहतूक होईल अशी चर्चा आहे. तिसऱ्या टप्प्यात रेल्वे सेवा मर्यादित आणि प्रायोगिक तत्वावर चालवली जातेय. त्याच प्रमाणे लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात म्हणजे 18 मे पासून मर्यादित स्वरुपात काही विमान फेऱ्यांना परवानगी मिळण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातंय.

काल रात्री 8 वाजता, देशाला उद्देशून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा चौथा टप्पा असेल, मात्र तो वेगळ्या रंगा-ढंगात असं असेल आवर्जून सांगितलं. यावरुनच चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती मिळतील तसंच निर्बंध खुले होतील असंही अनेकांना वाटत आहे.

विमान वाहतूक मंत्रालयाने विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून तसंच या क्षेत्रातील जाणकारांकडून एसओपी म्हणजे व्यावसाय करण्याची प्रमाणित पद्धतीबाबत सूचना मागवल्या आहेत. दोन प्रवाशांमधील शारिरीक अंतर तसंच स्वच्छता राखण्यासाठी काय काय उपाय योजना कराव्यात याची माहिती विचारण्यात आलीय. विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्या, एअरपोर्टवरील कर्मचारी वर्ग तसंच विमानातील कर्मचारी वर्ग या सर्वांसाठीच अशा एसओपी खूप महत्वाच्या असणार आहेत, त्यासाठीच अशा सर्व घटकांकडून एसओपीसाठीच्या सूचना आणि अभिप्राय मागवण्यात आले आहेत.

काही जाणकारांच्या मते विमान प्रवास करण्यासाठी यापुढे आरोग्य सेतू हे अॅपही अनिवार्य केलं जाऊ शकतं. तसंच चेक इनसाठीही  वेब चेकइनचा पर्याय सुरवातीचे काही दिवस अनिवार्य केला जाऊ शकतो. त्यासोबतच मास्क तर अनिवार्य असेलच.

विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांसाठी म्हणजेच एअरलाईन्ससाठी असलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये विमानप्रवासा गरम जेवण बंद करणं तसंच प्रवाशांना वाचण्यासाठी मासिके किंवा अन्य पुस्तके न ठेवणं अशा बाबी असू शकतात. किमान तीन आधी चेक इन सुरु करणं तसंच विमानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग या बाबी आता अनिवार्य होऊ शकतात.

विमानतळांसाठीही अनेक निर्बंध किंवा अनिवार्य सूचना लागू होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामध्ये व्हिजिटर्सना विमानतळांवरील प्रवाशांच्या बाहेर पडण्याच्या ठिकाणी गर्दी करण्यास मनाई, दर अर्ध्या तासाला प्रवाशांचा वावर असलेली ठिकाणाचं निर्जंतुकीकरण करणं, शारिरीक अंतर राखण्यासाठीच्या खुणा आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे ओपन एअर व्हेंटिलेशन या महत्वाच्या बाबी असतील.