नवी दिल्ली : कोरोना व्हायरसपुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतातही लॉकडाऊन लागू करण्यात आला असून 17 मे रोजी या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस होता. परंतु, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील लॉकडाऊन वाढणार असून 17 मेनंतर देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होणार असल्याची घोषणा काल (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. परंतु, या देशव्यापी लॉकडाऊनचा लोकांवर काय परिणाम झाला आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात आलाच असेल. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी देशातील सिव्हिल सोसायटी संस्थांनी 12 राज्यांमधील 5000 ग्रामीण कुटुंबांचा सर्व्हे केला. सर्व्हेमधून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, या कठिण काळाशी दोन हात करण्यासाठी या कुटुंबांमधील अर्ध्या व्यक्ती गरजेपेक्षा कमी जेवत आहेत.


68 टक्के कुटुंबांचं म्हणणं आहे की, त्यांनी आपल्या जेवणातील खाद्यपदार्थांची संख्या कमी केली आहे. 50 टक्के कुटुंबियांनी सांगितलं की, 'ते एका दिवसात जेवढ्या वेळा जेवत होते, आता त्यापेक्षा कमी वेळा जेवत आहेत. तर 24 टक्के कुटुंबांनी उधारीवर उदरनिर्वाह करत असल्याचं सांगितलं आहे.


पाहा व्हिडीओ : केंद्रीय नितीन गडकरी यांच्याकडून Atmanirbhar Bharat Abhiyan योजनेचं कौतुक



टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सर्व्हेमधील 84 टक्के कुटुंबियांचं म्हणणं आहे की, त्यांनी पीडीएसमार्फत राशन खरेदी केलं आहे. 16 टक्के कुटुंबांना पोटभर जेवणंही नशीबात नाही. देशात लॉकडाऊन लागू केल्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे अनेक लोकांच्या हाताला काम नाही. काम नाही, खिशात पैसे नाहीत. त्यामुळे देशभरातील अनेक लोकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जेवणाची भ्रांत आहे. याची झळ ग्रामीण भागातही दिसून येत आहे.


12 राज्य, 47 जिल्हे, 5162 कुटुंब


देशांतील 12 राज्यांच्या 47 जिल्ह्यांमधील 5162 ग्रामीण कुटुंबांमध्ये हा सर्वे करण्यात आला. मध्यप्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, आसाम आणि कर्नाटकात 28 एप्रिलपासून 2 मे दरम्यान, हा सर्वे करण्यात आला.


केंद्र सरकारने देशाचा करोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. तसेच देशात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 74 हजारांच्या पार गेला आहे. तर 2415 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत 24 हजार 386 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.


संबंधित बातम्या : 


देशात गेल्या 24 तासांत 122 लोकांचा मृत्यू, एका दिवसात सर्वाधिक 1931 रुग्ण कोरोनामुक्त


पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर पॅकेजवरुन काँग्रेसमध्ये वेगवेगळी मतं, काही नेत्यांचा विरोध तर काहींकडून कौतुक


पंतप्रधान मोदींकडून चौथ्या लॉकडाऊनची घोषणा, नियमांचा तपशील 18 मे पूर्वी जाहीर होणार