Omicron : दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रोन या नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटनं जगभरातील देशांना चिंतेत टाकलं आहे. हा व्हेरिएंट डेल्टापेक्षा धोकादायक असल्याचं बोललं जात आहे. या नव्या विषाणूवर लसीचाही प्रभाव होत नसल्याचं समोर आलं. ओमिक्रोन व्हेरिएंटचा धोका ओळखून राज्य आणि केंद्रानं उपयोजना करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्थरीय बैठक बोलवत सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहे. शनिवारी सायंकाळी बंगळुरुमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. अशाताच आयसीएमआरकडून ओमिक्रोन व्हेरिएंटविरोधात भारतातील लसी किती प्रभावी ठरतील याबाबत सांगतिलं आहे.
आयसीएममधील एपिडेमियोलॉजी आणि कम्युनिकेबल डिसीज विभागाचे प्रमुख डॉ. समीरन पांडा यांनी ओमिक्रॉनवर भारतीय लस प्रभावी पडू शकतात का? याबाबत स्पष्टपणे काही सांगितलं नाही. ते म्हणाले की, ‘जगभरात वेगवगळ्या प्रकारच्या कोरोना प्रतिबंधक लसी आहेत. काही लसी स्पाइक प्रोटीन आणि रिसेप्टर इंटरॅक्शनकडे निर्देशित केल्या जातात. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमध्ये आलेल्या बदलांशी जुळवून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यात बदल झाला असेल तर लसी ओमिक्रॉन व्हेरिएंटविरोधात प्रभावित होणार नाहीत. पण सर्व प्रतिबंधक लसी सारख्या नसतात. ‘
भारतातील कोरोना प्रतिबंधक लसी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन आपल्या शरीरात वेगवेगळ्या अँटीजन सादरीकरणाद्वारे रोगप्रतिकारशक्ती तयार करतात. जगभरातील संशोधकांनी आतापर्यंत ओमिक्रॉनचे संरचनात्मक बदल पाहिले आहेत. पण ओमिक्रॉन हा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक घातक आहे की नाही, हे अद्याप समोर आलेलं नाही. त्यासाठी आणखी अभ्यास करावा लागणार आहे, असं डॉ. समीरन पांडा म्हणाले. ओमिक्रोन व्हेरिएंट अधिक प्रमाणात म्युटेट होतोय अथवा या विषाणूमुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे का? याबाबत अभ्यास करावा लागेल. यासाठी आणखी वेळ लागणार आहे. पुढील धोका लक्षात घेऊनच जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिएंटला चिंताजनक म्हटलेय, असं पांडा म्हणाले.
ओमिक्रॉन व्हेरिएंटविरोधात सध्याच्या लसी प्रभावी ठरतील का? यावर बोलताना डॉ. पांडा म्हणाले की संसर्गाचा प्रकार, त्या व्हेरिएंटचा योग्य निरीक्षण आणि अभ्यास तसेच आपल्याकडील उपलब्ध लसी कोणत्या प्रकारची प्रतिकारशक्ती निर्माण करतात. हे वेळ आल्यानंतरच समजेल. नव्या रिपोर्ट्समध्ये संरचनात्मक बदल दिसून आले आहेत. जे सेल, सेल्युलर रिसेप्टर्ससह प्रसारित होण्याची शक्यताचे संकेत देतात. पण प्रत्यक्षात याचा अधिक वेगाने प्रसार होत आहे की संसर्गाचे क्लस्टर्स कारणीभूत आहेत, हे सांगायला थोडा वेळ लागेल. यासर्वांवर अभ्यास सुरु आहे. याबाबत अधिक खोलवर अभ्यास करावा लागेल. नव्या व्हेरिएंट अधिक प्रमाणात संक्रमित करतो का? हा विषाणू खरेच अधिक धोकादायक आहे का? याबाबत आम्हाला आणखी अभ्यास करावा लागेल. हे सर्व लक्षात गेत जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिएंटला अधिक धोकादायक म्हटलेय.