Punjab Assembly Elections 2022 : देशात सध्या पाच राज्यांच्या विधनसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. यातील उत्तर प्रदेशमधील पहिला टप्पा पार पडला आहे. या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. याआधी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने जनतेला मोठ मोठी आश्वासने देत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) हे मतदारांना आकर्षीत करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. ख्रिश्चन मतदारांना आकर्षीत करण्यासाठी अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी सिद्धू गेले होते. यावेळी त्यांनी मी चर्च, मंदिर-मशीद आणि गुरुद्वारामध्येही जातो. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत कोणीही ख्रिश्चन धर्माकडे कोणीही वाईट नजरेने पाहू शकत नसल्याचे सिद्धूंनी म्हटले आहे.
सर्वांना समान कायदा
सिद्धू म्हणाले, की मी चर्च, मशीद, गुरुद्वारा आणि अलीकडे वैष्णोदेवीलाही भेट दिली. सर्वांना समान कायदा आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला खात्री देतो की कोणीही ख्रिश्चन धर्मावर वाईट नजर टाकू शकत नाही. नवज्योत सिंह सिद्धू हे नुकतेच वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले होते. आठवडाभरातील त्यांची ही दुसरी भेट होती. हे सर्व सिद्धू हिंदू मतादारांना आकर्षित करण्यासाठी करत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. सिद्धू यांच्यासमोर अकाली दलाचे बिक्रम सिंह मजिठिया मैदानात आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये चुरशीची लढत असल्याने ही जागा हॉट सीट बनली आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघात मोठ्या प्रमाणात हिंदू लोकसंख्या आहे. त्यामुळेच सिद्धू हिंदू समाजाला आकर्षित करण्यासाठी वैष्णोदेवीची यात्रा करत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारांना आकर्षीत करण्यासाठी राजकीय नेते मोठमोठी आश्वासने देत आहेत. दरम्यान, पंजाबमध्ये कॉंग्रेसची लढत ही प्रामुख्याने आम आदमी पक्ष आणि अकाली दल- बीएसपीच्या युतीशी होणार आहे. या निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. तर आम आदमी पक्ष बहुमताजवळ जाण्याची शक्यता आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पंजाब लोक कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षाशी युती केली आहे. एबीपी माझाच्या सी वोटर सर्व्हेमध्ये वरील अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्व्हेनुसार या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे. कॉंग्रेसला 117 जागांपैकी 24 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 55 ते 66 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अकली दल महायुतीला 20 आणि 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला तीन ते 11 जागांवर समाधान मानावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: