नवी दिल्ली : लग्नानंतर पत्नीच्या धर्मांतराबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. "एखाद्या महिलेने दुसऱ्या धर्मातील पुरुषाशी लग्न केलं तर तिचा धर्म बदलणार नाही. अशाप्रकारचा कोणताही कायदा भारतात नाही," असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.


एका पारशी महिलेच्या प्रकरणात सुनावणी करताना सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाने हा निकाल दिला आहे. या घटनापीठात दीपक मिश्रा यांच्यासह न्यायमूर्ती ए के सीकरी, एएम खानविलकर, डीवाय चंद्रचूड आणि अशोक भूषण यांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण?
गुलरुख एम. गुप्ता नावाच्या महिलेने एका हिंदू पुरुषाशी लग्न केलं. तिला तिच्या आई-वडिलांच्या अंत्यसंस्कारांना हजर राहायचं होतं. परंतु वलसाड पारसी बोर्डाने यासाठी परवानगी नाकारली होती.

या प्रकरणाची पहिली सुनावणी 2010 मध्ये गुजरात हायकोर्टात झाली होती. पारशी महिलेने दुसऱ्या धर्मातील पुरुषाशी लग्न केलं तर पतीचा धर्मच तिचा धर्म असेल, असं निर्णय गुजरात हायकोर्टाने दिला होता.

त्यामुळे पारशी महिला अंत्यसंस्कारासाठी पारशींच्या 'टॉवर ऑफ सायलेन्स' मध्ये जाण्याचा अधिकार गमावला होता.

मात्र एखाद्या पारशी पुरुषाने दुसऱ्या धर्मातील महिलेशी लग्न केलं, तरी त्याचा धर्म कायम राहतो. मग पारशी महिलेसोबत वेगळा न्याय का असा प्रश्न महिलेने उपस्थित केला.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात म्हटलं की, "महिलेने दुसऱ्या धर्मातील पुरुषासोबत लग्न केल्यास तिचा धर्म बदलेल, असा कोणताही कायदा नाही.आपल्याकडे स्पेशल मॅरेज अॅक्ट आहे.  दोन वेगवेगळ्या धर्माचे व्यक्ती लग्नानंतरही आपापली धार्मिक ओळख कायम ठेवू शकतात," असं खंडपीठाने म्हटलं.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 डिसेंबरला होणार आहे. या दिवशी वलसाड बोर्ड ट्रस्टची बाजूही ऐकली जाईल. 9 ऑक्टोबरलाच हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्यात आलं होतं.