Divorce Case in Madhya Pradesh High Court: नवी दिल्ली : शारीरिक संबंधांना (Physical Relationship) विरोध करणं 'मानसिक क्रूरता' (Mental Cruelty) आहे आणि हिंदू विवाह कायद्यांतर्गत (Hindu Marriage Act) हे घटस्फोट (Divorce Case) घेण्यासाठी वैध कारण आहे, असं महत्त्वाचं निरिक्षण मध्यप्रदेश हायकोर्टानं (Madhya Pradesh High Court) एका घटस्फोटाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान नोंदवलं आहे. दरम्यान, सुदीप्तो साहा आणि मौमिता साहा यांच्याशी संबंधित खटल्यात न्यायालयानं 3 जानेवारी रोजी हा महत्त्वाचा आदेश दिला. 


मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विनय सराफ यांच्या खंडपीठानं सुदीप्तोला घटस्फोट देण्यास नकार देणारा कौटुंबिक न्यायालयाचा 2014 चा निर्णय बाजूला ठेवला. तसेच, "शारीरिक जवळीक नाकारणं म्हणजे, मानसिक क्रूरता आहे.", अशी टिप्पणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयानं केली आहे. 


याचिकाकर्त्यांनी 2006 मध्ये बांधलेली लग्नगाठ 


सुदिप्तोनं दाखल केलेल्या याचिकेनुसार, त्यानं मौमितासोबत घटस्फोटाची मागणी केली होती. 12 जुलै 2006 रोजी लग्नाच्या दिवसापासून 28 जुलै 2006 रोजी पती देश सोडून जाईपर्यंत सतत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देऊन मौमितानं लग्नाचा अर्थच पूर्ण होऊ दिलं नाही. सुदिप्तोनं सांगितल्यानुसार, मौमिताच्या पालकांनी तिला लग्न करण्यास भाग पाडल्याचं सांगितलं. तसेच, लग्नापूर्वी तिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते, पालकांना ते अमान्य असल्यामुळे त्यांनी तिच्यावर दबाव टाकत तिला लग्न करण्यास भाग पाडल्याचं सांगितलं. 


मध्यप्रदेश हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनुसार, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या आपल्या लग्नानंतर मौमितानं सुदीप्तोकडे लग्न मोडण्याचा आग्रह धरला. तसेच, आपल्याला प्रियकराकडे जाण्याची परवानगी द्यावी, असाही तगादा मौमितानं सुदीप्तोच्या मागे लावला. भोपाळमध्ये आपल्या घरी पोहोचल्यानंतरही तिनं त्यांचं लग्न मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला. दरम्यान, मौमितानं सप्टेंबर 2006 मध्ये भोपाळमध्ये आपलं सासरचं घर सोडलं आणि त्यानंतर ती परतलीच नाही, अशी माहिती सुदीप्तोनं दिली आहे. 


पत्नीनं खोटी तक्रार दाखल करुन उकळले 10 लाख 


सुदीप्तोनं आरोप लावला की, त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीनं 2013 मध्ये त्याच्या आणि त्याच्या आई-वडिलांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली होती. हुंड्यासाठी सासरच्यांनी तिला त्रास दिल्याचा आरोप मौमितानं केला होता. तसेच, सुदीप्तो आणि त्याच्या कुटुंबानं साडीनं तिचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाहीतर सुदीप्तोच्या घरच्यांनी तिला जीवंत जाळण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप मैमितानं लावला आहे. मौमिताच्या आरोपांमुळे सुदीप्तोनं आई-वडिलांना तब्बल 23 दिवस पोलीस कोठडीत घालवले. 


सुदीप्तोनं सांगितलं की, मौमितानं प्रकरण मिटवण्यासाठी त्याच्या वडिलांकडून तब्बल 10 लाख रुपये उकळले. एवढंच नाहीतर, भोपाळ पोलीस स्थानकात आणखी एक तक्रार दाखल केल्यानंतर घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या केल्या. 


पैसे घेऊनही घटस्फोट देण्यास नकार


मौमितानं सक्षम न्यायालयासमोर स्वाक्षरी केलेली याचिका सादर करण्यास नकार दिला. यानंतर सुदीप्तोनं घटस्फोटासाठी भोपाळ न्यायालयात धाव घेतली, परंतु घटस्फोटासाठी कोणतंही कारण नसल्याचं सांगत न्यायालयानं त्याची विनंती फेटाळली. त्यानंतर त्यानं मध्यप्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली, ज्यानं अखेर त्यांचा घटस्फोट मंजूर केला.