ED Summon To Delhi CM Arvind Kejriwal: नवी दिल्ली : दिल्ली (Delhi) दारू घोटाळा प्रकरणी (Delhi Liquor Case) ईडीनं (ED) पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांना समन्स बजावलं आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना 18 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश ईडीकडून देण्यात आले आहेत. दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ED) केजरीवाल यांना पाठवलेलं हे चौथं समन्स आहे. यापूर्वी ईडीनं तीन वेळा केजरीवालांना समन्स धाडलं आहे. 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर आणि 3 जानेवारी असे एकूण तीन समन्स ईडीकडून केजरीवालांना बजावण्यात आले होते. पण तिनही वेळी अरविंद केजरीवाल ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत, आता चौथ्या समन्सनंतर केजरीवाल ईडीसमोर हजर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ईडीनं 3 जानेवारीला अरविंद केजरीवालांना समन्स बजावलं होतं. त्यावेळी आम आदमी पार्टीनं म्हटलं होतं की, अरविंद केजरीवाल ईडीला चौकशीत सहकार्य करण्यासाठी तयार आहेत. मात्र, ईडीनं बजावलेलं समन्स हे राजकारणाशी संबंधित आहे. अरविंद केजरीवालांना अटक करण्याचा ईडीचा डाव आहे, असा आरोपही आपच्या वतीनं करण्यात आला होता. परंतु, ईडीनं बजावलेल्या चौथ्या समन्सनंतर अद्याप आम आदमी पक्षाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
AAP चा दावा
ईडीकडून वारंवार समन्स बजावण्यात आल्यानंतर आम आदमी पक्षाच्या वतीनं दावा केला जात आहे की, हा सर्व खटाटोप अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी सुरू आहे. ईडी त्यांना चौकशीसाठी बोलावून अटक करणार आहे. आपचं म्हणणं आहे की, जर ईडीला चौकशी करायची असेल, तर ते आपले प्रश्न लिहून केजरीवालांना पाठवू शकतात.
काही दिवसांपूर्वीपासूनच आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केजरीवालांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यास सुरुवात केली होती. आप नेत्यांनी दावा केलेला की, ईडी आज अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी धाडही टाकू शकते आणि त्यांची अटकही करु शकते. दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेले आतिशी, सौरभ भारद्वाज आणि राज्यसभेचे खासदार संदीप पाठक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरुन दावा केला होता की, केजरीवाल यांच्या निवासस्थानी ईडीकडून आज छापेमारी केली जाऊ शकते, तसेच, त्यानंतर त्यांना अटकही केली जाऊ शकते.
भाजपनं फेटाळले आरोप
ते स्वतःला कायद्यापेक्षा वरचे समजतात, 'आप'च्या या आरोपांवर भाजपनंही हल्लाबोल केला आहे. भाजपचे प्रवक्ते हरीश खुराणा यांनी म्हटलं की, "आतिशी किंवा इतर आप नेत्यांना नवनव्या गोष्टी रचण्यात मजा येते. विपश्यना तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कायदा नाही. लोकसभेच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत, कायदा नाही. अरविंद केजरीवाल स्वतःला कायद्यापेक्षा वरचे समजतात."
समन्सकडे सतत दुर्लक्ष करतंय 'आप'
यावर्षी 16 एप्रिल रोजी दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अरविंद केजरीवाल यांची जवळपास 9 तास चौकशी केली होती. केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांना 2 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. परंतु 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्याचं कारण देत ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. यानंतर, 18 डिसेंबर रोजी, ईडीनं त्यांना पुन्हा समन्स जारी केलं आणि 21 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितलं, परंतु मुख्यमंत्री केजरीवाल यांनी तेव्हाही ईडीसमोर हजर होणं टाळलं.