भोपाळ : देशातील अनेक भागात पतीच्या निधनानंतर महिलांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नाही. मध्य प्रदेशातील महिलांच्या वाटेला येणारी अवहेलना कमी करण्यासाठी सरकारकडून फुंकर घालण्याचा प्रयत्न होणार आहे. मध्य प्रदेशातील विधवांना यापुढे 'कल्याणी' अशा नावाने संबोधित करण्यात येणार आहे.


मध्य प्रदेशातील सरकारी कामकाजात यापुढे विधवा महिलांचा उल्लेख 'कल्याणी' असा केला जाईल. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने एक खाजगी वृत्तवाहिनीवर आयोजित कार्यक्रमात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी ही घोषणा केली.

राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अर्चना चिटणीस यांनी विधवा हा शब्द व्यवहारातून बाद करण्याची मागणी केली होती. महिला सशक्तीकरणासाठी समाजातून विधवा या शब्दाचं उच्चाटन करण्याची आवश्यकता असल्याचं चिटणीस यांनी विधानसभेत अधोरेखित केलं होतं.

शिवराज सिंह यांच्या घोषणेनंतर अर्चना चिटणीस यांनी त्यांचे आभार मानले. महिलांबाबत संवेदनशीलता आणि सन्मान दाखवल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करताना समाजात समानता प्रस्थापित करण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.