Veerappan Rajkumar kidnap : जुलै 2000 ची गोष्ट. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील जेम्स बाँड म्हणून ओळख असणारे अभिनेते डॉ. राजकुमार यांचे कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनने 30 जुलै 2000 रोजी अपहरण केले होते. कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेता पुनीत याचे राजकुमार हे वडील होते. तिरुपती येथे भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन कर्नाटकात परतत असतानाच डॉ. राजकुमार यांचे फार्महाऊसवरून अपहरण केले. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी पार्वताम्मा, जावई एएस गोविंदराजा आणि सहाय्यक दिग्दर्शक नागप्पा असे तीन लोक होते. तिरूपतीचे दर्शन घेऊन परताना कर्नाटकात जाण्यापूर्वी त्यांनी काही दिवस तामिळनाडूत घालवण्याचा निर्णय घेतला. गजानूर येथे त्यांचे स्वतःचे फार्महाऊस होते. रात्रीचे जेवण उरकून ते कुटुंबासह टीव्ही पाहात होते. त्याचवेळी अचानक 15 शस्त्रधारी त्यांच्या घरात घुसले. त्यांचे नेतृत्व केले कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याने.
17 व्या वर्षी पहिल्यांदा हत्तीची शिकार
त्या काळात कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सीमावर्ती भागात वीरप्पनची खूप दहशत होती. वीरप्पनने वयाच्या 17 व्या वर्षी पहिल्यांदा हत्तीची शिकार केल्याचे सांगितले जाते. हत्तीला मारण्याची त्याची आवडती पद्धत म्हणजे कपाळाच्या मध्यभागी गोळी झाडणे. 1993 मध्ये त्याने तामिळनाडूच्या जंगलात गस्त घालणाऱ्या 21 पोलिसांना बॉम्बस्फोट करून ठारे केले होते. त्यामुळे कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सरकारांनाही त्याची भीती वाटत होती.
राजकुमार यांच्या सुरक्षेची ग्वाही
वीरप्पनने राजकुमार यांचे त्यांच्या फार्महाऊसमधून अपहरण केले. जाण्यापूर्वी त्यांनी पत्नी पर्वतम्मा यांना एक व्हिडीओ कॅसेट दिली आणि ती कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यास सांगितले. कॅसेट मिळाल्यानंतर पुढे काय करायचे ते त्यांना कळेल असे विरप्पण याने सांगितले. शिवाय राजकुमार यांना काहीही होणार नाही, अशी ग्वाहीही दिली.
अटींचा आजपर्यंत उलगडा नाही
राजकुमार यांच्या अपहरणाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. या घटनेमुळे कर्नाटक आणि तामिळनाडूच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. चाहत्यांमध्ये राजकुमार यांचा दर्जा देवापेक्षा कमी नव्हता. त्यामुळेच बंगळुरूचे रस्ते त्यांच्या चाहत्यांनी भरले होते. राजकुमार यांच्यासोबत कोणतीही दुर्घटना घडली म्हणजे संपूर्ण दक्षिण भारत दंगलीच्या आगीत होरपळून निघेल अशी शक्यता होती. पवारम्मा यांनी बंगळुरूला पोहोचून कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री एसएम कृष्णा यांच्याकडे व्हिडीओ कॅसेट सुपूर्द केली. त्या व्हिडीओमध्ये वीरप्पन याने राजकुमार यांना सोडण्यासाठी अटी घातल्या होत्या. त्यात अनेक अटी होत्या, ज्या पूर्ण करणे अशक्य होते. परंतु, त्या अटी आजपर्यंत उघड झालेल्या नाहीत.
दोन राज्यातील वादामुळे सुटकेला विलंब
राजकुमार यांच्या सुरक्षित सुटकेसाठी तामिळनाडू आणि कर्नाटक सरकारने एकत्र काम करणे आवश्यक होते. मात्र, कावेरी पाणी वादामुळे दोन्ही राज्यांमधील संबंध अतिशय तणावपूर्ण झाले होते. त्यामुळे अपहरणाच्या वृत्तानंतर राजकुमार यांच्या चाहत्यांनी कर्नाटकातील तमिळ बहुसंख्य लोकसंख्या असलेल्या ठिकाणीही हल्ले केले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एसएम कृष्णा तेव्हा राजकारणात नवखे होते. सत्तेत येऊन एक वर्षही झाले नव्हते. त्यामुळे त्यांना अशा परिस्थितीला सामोरे जाण्याचा विशेष अनुभव नव्हता.
मध्यस्त म्हणून गोपाल यांची नियुक्ती
त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम करुणानिधी यांच्याशी बोलायचे ठरवले. दोघांची भेट झाली आणि तिथून सुटकेची आशा निर्माण झाली. नंतर आपल्या आत्मचरित्रात एसएम कृष्णा यांनी द्रमुकचे सुप्रीमो करुणानिधी यांचे आभार मानले. करुणानिधी यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून दिलेल्या पाठिंब्याशिवाय राजकुमार यांच्यापर्यंत पोहोचणेही अवघड होते, असे त्यांनी पुस्तकात लिहिले आहे. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थ म्हणून एका तामिळ मासिकाचे प्रकाशक गोपाल यांची नियुक्ती केली.
वीरप्पनचा ठावठिकाणा शोधणे गोपाल यांच्यासाठी कठीण काम होते. त्याने आपल्या छोट्या टीमसोबत 10 दिवस वीरप्पनचा शोध घेतला. शेवटी वीरप्पनच्या साथीदारांच्या मदतीने त्यांना त्याचा ठावठिकाणा कळला. वीरप्पनने गोपालला आपल्याजवळ बोलावले. अनेक अंतर चालल्यानंतर तो वीरप्पन जवळ पोहोचला. गोपाल नंतर एका मुलाखतीत म्हणाले की, जेव्हा जेव्हा मला ती घटना आठवते तेव्हा मला वाटते की राजकुमार यांनी एवढा लांबचा प्रवास कसा केला असेल?
108 दिवसांनी राजकुमार यांची सुटका
वीरप्पनने अनेक व्हिडीओंच्या माध्यमातून सरकारला पुन्हा आपल्या अटी सांगितल्या. विशेष म्हणजे यामध्ये राजकुमार यांना'पेरियावर' असे संबोधले जात असे. हा शब्द वृद्धांसाठी मोठ्या आदराने वापरला जातो. वीरप्पन आणि सरकारी मध्यस्थ यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. अखेर 15 नोव्हेंबर रोजी 108 दिवसांनी वीरप्पनने राजकुमार आणि त्यांच्या जावयाची सुटका केली.
पाच कोटींचे बक्षीस
कोणत्या अटींवर राजकुमार यांची सुटका झाली हे रहस्य आजतागायत उलगडलेले नाही. वीरप्पनने 184 जणांची हत्या केली होती. त्यापैकी 97 जण पोलीस कर्मचारी होते. विरप्पनला पकडून देणाऱ्यास तब्बल पाच कोटी रुपयांचे बक्षीस होते. त्याला मारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्सवर 100 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. राजकुमार यांच्या अपहरणानंतर दोन वर्षांनी वीरप्पनने कर्नाटकचे मंत्री एच नागप्पा यांचेही अपहरण करून त्यांची हत्या केली. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की विरप्पन याने राजकुमार यांनाच सुरक्षित कसे सोडले?
वीरप्पनच्या कैदेतून सुटल्यानंतर राजकुमार म्हणाले होते की, संपूर्ण घटनाक्रम एक उत्कृष्ट स्क्रिप्ट आहे. ज्यावर एक उत्कृष्ट चित्रपट बनू शकतो. वीरप्पनची त्यांच्यासोबतची वागणूक खूप छान होती, असेही त्यांनी सांगितले. एप्रिल 2006 मध्ये राजकुमार यांचे निधन झाले.