चेन्नई : दक्षिण भारताच्या राजकारणातील पितामह म्हणून ओळखले जाणारे एम.करुणानिधी यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. करुणानिधी यांचं नाव घेतल्यानंतर काळा चष्मा, पांढऱ्या कपड्यांवर पिवळी शाल घेतलेल्या एका व्यक्तीची प्रतिमा मनात तयार होते. करुणानिधी मागील 50 वर्षांपासून चष्मा वापरत होते. पण या काळ्या चष्म्याची संपूर्ण कहाणी काय आहे?
1968 मध्ये चेन्नईला जाताना एका कार अपघातामध्ये करुणानिधी यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली होती. उन्हापासून संरक्षण व्हाव यासाठी डॉक्टरांनी त्यांना चष्मा घालायला सांगितलं. त्यानंतर मोठ्या फ्रेमचा काळा चष्मा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनला. या चष्म्याचा करुणानिधी यांच्या स्टाईलमध्येच समावेश झाला. करुणनिधी कायमच पांढरे कपडे आणि पिवळी शाल परिधान करत असत. विशेष म्हणजे ते दरदिवशी दाढी करत असत.
'तुमच्या चष्म्याची फ्रेम बदला,' असा सल्ला डॉक्टरांनी मागील वर्षी करुणानिधी यांना दिला होता. यानंतर संपूर्ण देशात करुणानिधी यांच्यासाठी सूटेबल फ्रेमचा शोध सुरु झाला. 40 दिवस शोध घेतल्यानंतर जी फ्रेम करुणानिधी यांना आरामदायी वाटली, ती जर्मनीमधून मागवण्यात आली होती. चेन्नईतील विजया ऑप्टिकलने जर्मनीवरुन हा चष्मा मागवला. या चष्म्याची फ्रेम वजनाने अतिशय हलकी होती.
डॉक्टरच्या सल्ल्यानंतर सुमारे 46 वर्षांनंतर करुणानिधी यांनी आपला चष्मा बदलला. करुणनिधी मागील एक वर्षांपासून फारच आजारी होते. ते बाहेर पडायचे नाहीत. त्यामुळे त्यांना चष्म्याची फार गरज भासत नसे. त्यामुळे ते चष्मा बदलण्यास लगेचच तयार झाले.
करुणानिधी यांचे प्रतिस्पर्धी एमजीआरही काळा चष्मा घालत असत. इतकंच नाही तर त्यांना टोपी आणि चष्म्यासह दफन करण्यात आलं. राजकारणातील दोन दिग्गज करुणानिधि आणि एमजीआर यांनी दक्षिणेत काळा चष्मा फॅशनमध्ये आणला.