Diesel Shortage Likely : गेल्या वर्षभरात इंधनाच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशातच आता आणखी महत्वाची माहिती समोर आलीय. आगामी काळात संपूर्ण जगभरात डिझेलची समस्या उद्धभवू शकते. पूरवठा कमी झाल्यामुळे डिझेलची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे येत्या काळात डिझेलच्या किंमतींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वाहतुकीसाठी डिझेलची खूप आवश्यकता असते. ट्रक, बस, जहाजे आणि ट्रेन यासह अनेक वाहने डिझेलवर चालतात. याशिवाय बांधकाम, उत्पादनाह शेतीमध्ये देखील डिझेलचा वापर केला जातो. अलीकडे डिझेलला पर्याय म्हणून नैसर्गिक वायूचा वापर केला जात आहे. परंतु, नैसर्गिक वायूच्या किंमती गगनाला भिडत असताना अनेक ठिकाणी गॅसऐवजी डिझेलचा वापर केला जात आहे. अशातच आता डिझेलचे संकट निर्माण होणार आहे.
डिझेलची समस्या उभी राहिली तर दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत डिझेलच्या किमती वाढल्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेवर 100 अब्ज डॉलर्सचा आर्थिक बोजा वाढण्याचा अंदाज आहे. अमेरिकेतील डिझेल आणि हीटिंग ऑइलचे साठे चार दशकांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. वायव्य युरोपमध्ये देखील डिझेलच्या स्टॉकची कमतरता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाकडून डिझेलचा पूरवठा कमी करण्यात आलाय. यामुळे मार्च 2023 मध्ये डिझेलचे संकट आणखी गडद होऊ शकते. जागतिक निर्यात बाजारात डिझेलचे इतके संकट आहे की पाकिस्तानसारख्या गरीब देशांना देशांतर्गत गरजांसाठी देखील डिझेल मिळत नाही. बेंचमार्क असलेल्या न्यूयॉर्क हार्बरच्या स्पॉट मार्केटमध्ये या वर्षी डिझेलच्या किमती 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
जगभरातील इंधन शुद्धीकरण क्षमतेत घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबतही समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात मागणी कमी झाल्यानंतर रिफायनिंग कंपन्यांनी त्यांचे कमी नफा देणारे अनेक प्लांट बंद केले. 2020 पासून यूएस शुद्धीकरण क्षमता प्रतिदिन एक दशलक्ष बॅरलने कमी झाली आहे. तर युरोपमध्ये कामगारांच्या संपामुळे रिफायनिंगवर परिणाम झाला आहे. रशियाकडून पुरवठा बंद झाल्यानंतर अडचणी आणखी वाढणार आहेत. युरोपीय देश डिझेलवर सर्वाधिक अवलंबून आहेत. फेब्रुवारीमध्ये, युरोपियन युनियनच्या सागरी मार्गांनी रशियाला वितरणावर बंदी लागू होईल. मात्र रशियातून येणाऱ्या पुरवठ्याला पर्याय न मिळाल्यास युरोपीय अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
भारताला फायदा, मात्र, गरिब देशांना फटका
डिझेलची समस्या निर्माण झाली तर त्याचा भारत आणि चीनच्या रिफायनिंग कंपन्यांना फायदा होईल. या कंपन्या जास्त दराने डिझेल विकू शकतील. परंतु, गरीब देशांना डिझेल खरेदी करणे कठीण होऊ शकते. पाकिस्तान श्रीलंकेसारख्या गरीब देशांना इंधन खरेदी करण्यात अडचणी निर्माण होणार आहेत.