Assam Meghalaya Border Clash: आसाम मेघालय या दोन राज्यांच्या सीमेवर मंगळवारी सकाळी फायरिंगची एक घटना घडली. या फायरिंगमध्ये मेघालयाच्या पाच जणांचा मृत्यू झाला. तसेच आसामच्या एका फॉरेस्ट गार्डचा मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या हिंसाचारामुळे पुढच्या 48 तासांसाठी या भागातील सात जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे. आसाम पोलिसांकडून जंगलातील लाकडांची तस्करी करणाऱ्या एका ट्रकवर कारवाई केली जात असताना ही घटना घडली. 


मेघालयच्या वेस्ट जैंतिया हिल्स, ईस्ट जैंतिया हिल्स, ईस्ट खासी हिल्स, री-भोई, ईस्टर्न वेस्ट खासी हिल्स, वेस्ट खासी हिल्स आणि साऊथ वेस्ट खासी हिल्स या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी सांगितलं की, मेघालयच्या पाच आणि आसामच्या एकाचा, असा सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गंभीर असलेल्या लोकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


ट्रक न थांबल्याने फायरिंग 


आसामच्या सीमेवर आलेल्या एका ट्रकला थांबण्याचे आदेश आसाम वन विभागाकडून देण्यात आले होते, पण तो ट्रक न थांबल्याने आसाम वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फायरिंग केली. त्या ट्रकचे टायर पंक्चर झाल्यानंतर चालक, त्याचा सहाय्यक आणि आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. एक व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर वनविभागाने याची माहिती पोलिसांना दिली. 


या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी लोकांनी एकच गर्दी केली आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोडून देण्याची मागणी केली. या गर्दीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना घेरलं. त्यानंतर गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये मेघालयच्या पाच लोकांचा मृत्यू झाला, तसेच एका वन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही सर्व माहिती आसाम पोलिसांनी दिली. 


मेघालयाचे मुख्यमंत्री कोनरॅड संगमा यांनी माहिती देताना सांगितलं की, मेघालय पोलिसांच्या वतीनं या घटनेचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी आसामच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे आणि त्यांनी सर्व सहकार्य देण्याचं आश्वासन दिलं आहे. 


आसाम आणि मेघालयमध्ये करार


आसाम आणि मेघालयाच्या दरम्यान असलेल्या 884 किमी सीमा असलेल्या 12 पैकी सहा आंतर-प्रादेशिक क्षेत्रांमधील सीमा विवाद सोडवण्यासाठी 29 मार्च रोजी एक करार करण्यात आला होता. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनरॅड संगमा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आंतरराज्य सीमा समस्या सोडवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.


काय आहे सीमावाद? 


आसाम आणि मेघालय सरकारने 884 किमी सीमा असलेल्या 12 पैकी सहा आंतर-प्रादेशिक क्षेत्रांमधील सीमा विवाद सोडवण्यासाठी मसुदा प्रस्ताव आणला होता. यानुसार 36.79 चौरस किमी जमिनीपैकी आसाम 18.51 चौरस किमी आणि उर्वरित 18.28 चौरस किमी मेघालयला देण्यात येईल.1972 मध्ये आसाममधून मेघालय वेगळे झाल्यानंतर हा जमिनीचा वाद सुरू झाला. तो या कराराने सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.