नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटना WHOच्या एका नव्या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक निष्कर्श समोर आले आहेत. संघटनेने 2011च्या जनगणनेनुसार केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील 57% डॉक्टरांकडे वैद्यकीय शिक्षणाची पदवीच नसल्याचे नमुद करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात ग्रामीण भागातील 100 पैकी 18 डॉक्टरांकडे डिग्री असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच एकूण देशभरातील अकडेवारी पाहिल्यास 82% डॉक्टर बोगस असल्याचे निष्कर्शामधून समोर आले आहे.

 

भारतातील डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना IMA  इंडियन मेडिकल असोसिएशन आणि त्यांना रेग्यूलेट करणारी MCI मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाच्या मतेदेखील देशातील बोगस डॉक्टरांची संख्या अधिक आहे. पण सरकारच्या मवाळ भूमिकेमुळे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

 

MCIच्या मते, देशभरात दोन लाख डॉक्टर बोगस आहेत. यांच्यावर गेल्या 20 वर्षांपासून कारवाईची मोहीम सुरू आहे, मात्र, तरीही यात यश आलेले नाही. देशातील गुजरात, महाराष्ट्र आणि केरळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांची दयनीय अवस्था असल्याने, बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याचे संघटनेचे मत आहे.

 

IMA च्या मतानुसार, देशात आयुर्वेदीक, होमियोपॅथी, फिजोथेरेपिस्ट आणि नॅचरोपेथची डिग्री घेऊन अनेक डॉक्टर अॅलिपॅथीची प्रॅक्टिस करत आहेत. विशेष म्हणजे, कम्पाउंडर आणि आशा वर्करदेखील डॉक्टरी करत आहेत. यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने, तसेच सरकार सर्वच ठिकाणापर्यंत जाऊन सुविधा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरत असल्याने यांचे फावत असल्याचे सांगितले जात आहे.

 

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते 85% आजार हे नैसर्गिकच बरे होतात. पण 15% आजार बळावल्याने प्रसंगी मृत्यू ओढावतो.

 

तेव्हा या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे हे आकडे डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहेत. पण तरीही यात काही नाविन्य नसल्याचे डॉक्टरांच्या संघटनेचे म्हणणे आहे. यासाठी कठोर कायदे करून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.