मुंबई: भारताची गणना आता एका आण्विक महासत्तेमध्ये केली जाते. जगातल्या बोटावर मोजण्याइतक्याच देशांकडे अणुबाँबचे शस्त्र आहे, त्यामध्ये भारताचा समावेश होतो. पण अमेरिका, रशिया, चीन अशा विकसित देशांची मक्तेदारी असलेला हा अणुबाँब भारताकडे कसा आला? त्याचं उत्तर आहे डॉ. होमी भाभा (Dr. Homi Bhabha) यांच्यामुळे. भारतीय अणुउर्जा कार्यक्रमाचे जनक (Father of India's Nuclear Programme) असलेल्या डॉ. होमी भाभांचे भौतिकशास्त्राच्या नोबेलसाठी पाच वेळा नामांकन झालं होतं. 


शीतयुद्धकाळात अमेरिका आणि रशियामध्ये अणुबाँबच्या निर्मितीसाठी स्पर्धा सुरू होती. अशा वेळी आपल्याला भारत सरकारने परवानगी दिली तर केवळ 18 महिन्यात अणुबॉम्ब तयार करेन असं वक्तव्य डॉ. होमी भाभा यांनी केलं. त्यानंतर जगात एकच खळबळ उडाली होती. 


डॉ. होमी जहांगीर भाभा (Homi Jehangir Bhabha) यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 साली मुंबईतील एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील हे टाटा समुहाचे सल्लागार होते. लहानपणापासूनच त्यांना विज्ञानावरील पुस्तकांच्या वाचनाची आवड होती. त्यामुळे सहाजिकच त्यांचा विज्ञान शाखेकडे कल वाढला. 1930 साली त्यांनी केंब्रीज विद्यापीठातून इंजिनीअरची पदवी घेतली. 1933 साली त्यांचे 'अॅबसॉर्ब्शन ऑफ कॉस्मिक रेडीएशन' हे पहिले संशोधन प्रसिध्द झाले आणि पुढे त्यांच्या संशोधन कार्याला वेग आला.


भारतात परतल्यानंतर अणुउर्जा संशोधनावर काम सुरू 


सन 1940 साली डॉ. भाभा (Dr. Homi Jehangir Bhabha) भारतात परतले आणि काही काळ त्यांनी बंगळुरु येथील भारतीय विज्ञान संस्थेत प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी काही शास्त्रज्ञांच्या मदतीने भारतात अणुऊर्जा संशोधनावर काम सुरु केले. अणुशक्तीचा वापर हा शांततामय मार्गाने, अणुऊर्जेसाठी व्हायला हवा या मतावर ते ठाम होते. अणुऊर्जेसाठी लागणारे युरेनियम भारतात मिळत नाही, पण भारतात मुबलक प्रमाणात असलेल्या थोरियमचे रूपांतर युरेनियमध्ये करता येते हे भाभांना माहीत होते. त्यांनी यावर काम करायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी जे.आर.डी. टाटांशी संधान साधून मुंबईत टाटा फंडामेंटल रिसर्च सेंटरची (Tata Institute of Fundamental Research) स्थापना केली.


अणुऊर्जा आयोगाची स्थापना


भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1948 साली त्यांनी पंतप्रधान नेहरुंच्या सहकार्याने अणुऊर्जा आयोगाची (Atomic Energy Commission) स्थापना केली. डॉ. भाभांचे अणुऊर्जेमधील संशोधन लक्षात घेता 1955 साली त्यांना आंतरराष्ट्रीय अणुशक्ती परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले.


डॉ. भाभांच्या प्रयत्नामुळेच 1956 साली ट्रॉम्बे येथे भारतालीच नव्हे तर आशियातील पहिली अणुभट्टी 'अप्सरा' (APSARA) उभारण्यात आली. त्यानंतर 'सायरस' आणि 'झर्लिना' या अणुभट्ट्याही उभारण्यात आल्या. या गोष्टी भारताच्या अणुऊर्जा विकासातील एक मैलाचा दगड ठरल्या. भारतात विकसित होणाऱ्या अणुउर्जेचा वापर शांततामय मार्गासाठीच व्हावा असे त्यांचे ठाम मत होते आणि या संकल्पनेवरच ते भारतातील अणुउर्जा विकास कार्यक्रम विकसित करत होते.


त्यांनी अणुऊर्जा संशोधनाव्यतिरिक्त स्पेस सायन्स, रेडिओ अॅस्ट्रॉनॉमी, इलेक्ट्रॉनिक्स आणि मायक्रोबायोलॉजी अशा प्रकारच्या अनेक संशोधनांना पाठिंबा दिला. डॉ. भाभा हे 1950 पासून 1966 पर्यंत भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. त्याचवेळी ते भारत सरकारचे अणुऊर्जा सचिव म्हणूनही काम करायचे.


नोबेलसाठी तब्बल पाच वेळा नामांकन


नोबेल पुरस्कार विजेते सर सी.व्ही. रमण हे डॉ. भाभा यांना 'भारताचा लिओनार्डो दा विन्सी' म्हणायचे. विज्ञानाव्यतिरिक्त त्यांना संगीत, चित्रकला आणि नृत्य अशा अनेक विषयात रुची होती. डॉ. भाभा यांना तब्बल पाच वेळा भौतिकशास्त्राच्य़ा नोबेलसाठी (Physics Nobel)  नामांकन मिळाले होते. पण दुर्दैवाने त्यांना या पुरस्कारापासून वंचित रहावे लागले. त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार प्राप्त झाला. डॉ. भाभांनी (Homi J. Bhabha) भारताच्या रचलेल्या अणुऊर्जेच्या पायावरच भारताने 18 मे 1974 साली पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वीपणे पार पाडली.


केवळ 18 महिन्यात अणुबॉम्ब तयार करण्याचा दावा


सन 1965 साली ऑल इंडिया रेडियोला (Homi Bhabha Interview To Radio AIR) दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की भारत सरकारची जर परवानगी मिळाली तर केवळ 18 महिन्यात आपण अणुबॉम्ब तयार करु शकतो. त्यांच्या या वक्तव्याने जगभर खळबळ माजली होती. खासकरुन अमेरिकेच्या पायाखालची वाळू सरकली होती. ऊर्जा, कृषी आणि मेडिसिन क्षेत्रात अणुऊर्जा कार्यक्रमाचा उपयोग व्हावा असे डॉ. भाभांनी सांगितले होते.


विमान अपघातात मृत्यू


व्हिएन्ना येथे एका अणुऊर्जा परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जाताना 24  जानेवारी 1966  रोजी फ्रान्सच्या माउंट ब्लॅकच्या परिसरात त्यांचे विमान क्रॅश झाले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. यामागे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा सीआयएचा हात असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. 


होमी भाभा यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा भारताच्या अणुविकास कार्यक्रमास बसलेला एक मोठा धक्का होता. भाभांच्या मृत्यूनंतर विक्रम साराभाई हे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष झाले. डॉ. भाभा यांचे भारताच्या अणुऊर्जा विकासातील योगदान लक्षात घेता 12 जानेवारी 1967 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मुंबईतील अणुशक्तीनगर येथील अणुसंशोधन केंद्राचे नाव बदलून ते 'भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर' (Bhaba Atomic Research Centre) असं ठेवलं. भारताने अणुउर्जेच्या क्षेत्रात आज जी काही मजल मारली आहे ती केवळ होमी भाभा यांनी निर्माण केलेल्या पायावरच केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.