Kerala Convention Center Blast latest Update : केरळमधील एर्नाकुलम येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. कलामासेरी येथील तीन स्फोटानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुण्यासह दिल्लीत (Mumbai, Pune Delhi Alert) अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासन आणि पोलीस सतर्क झाले आहेत. देशभरात ज्यूंची धार्मिक स्थळे असलेल्या भागात उच्चस्तरीय सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र, या स्फोटानंतर राज्य सरकार, केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.


20 मिनिटात तीन बॉम्बस्फोट


स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. रुग्णालयांना पूर्णपणे सज्ज राहण्यास सांगण्यात आलं असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. NSG ची NBDS टीम आणि NIA टीम केरळला रवाना झाल्या आहेत. या प्रकरणी केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे.  


स्फोट कुठे आणि कसा झाला?


केरळमधील एर्नाकुलममधील कलामासेरी येथे असलेल्या एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सीरियल बॉम्बस्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कन्व्हेन्शन सेंटरच्या हॉलमध्ये एकापाठोपाठ तीन स्फोट झाले. स्फोट झाला तेव्हा घटनास्थळी 2000 हून अधिक लोक उपस्थित होते आणि सर्वजण प्रार्थना करत होते. केरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजता पोलिसांना एक फोन आला, ज्यामध्ये एर्नाकुलममधील कलामासेरी येथे असलेल्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. 15 मिनिटांच्या अंतरानंतर दुसरा स्फोट झाला. दोन स्फोटानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. स्फोटामुळे तिथेही आग लागली. लोक स्वतःला वाचवण्यासाठी धावू लागले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, 15 ते 20 मिनिटांच्या अंतराने तिसरा स्फोट झाला.


स्फोटात एक ठार, 35 जण जखमी


या स्फोटात आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे, तर 35 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ७ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.


प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं धक्कादायक वास्तव


कन्व्हेन्शन सेंटर कमिटीचे सदस्य संजू यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी या स्फोटाबाबत संवाद साधला. तो म्हणाला, 'हा अपघात होता. आम्ही सगळे बाहेर धावलो. एवढेच आपल्याला माहीत आहे. आणि आम्ही सगळे बाहेर पळू लागलो. सर्वांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, दोन स्फोट झाले आणि आग लागली. आधी मोठा स्फोट झाला, त्यानंतर दुसरा छोटा स्फोट झाला. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या अन्य एका व्यक्तीने सांगितलं की, घटनेच्या वेळी हॉलमध्ये 2000 हून अधिक लोक होते. पहिला स्फोट प्रार्थनेदरम्यान झाला. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या एका वृद्ध महिलेने सांगितले की, पहिल्या स्फोटानंतर काही वेळातच आम्ही आणखी दोन स्फोट झाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Kerala Blast : मोठी बातमी! केरळ साखळी बॉम्बस्फोटातील सूत्रधाराचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, कोचीतील व्यक्तीने घेतली स्फोटाची जबाबदारी