मुंबई: अणुबाँब आणि त्याच्या विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस हा भारत आणि जगाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दिवस आहे. आजच्याच दिवशी भारतीय अणुउर्जा कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. होमी भाभा (Dr Homi Bhabha) यांचा जन्म झाला होता. तर अमेरिकेसोबत अणुबाँबच्या स्पर्धेत उतरलेल्या सोव्हिएत रशियाने 30 ऑक्टोबर 1961 रोजी हायड्रोजन बाँबची चाचणी केली. त्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली होती. यासह आजच्या दिवशी घडलेल्या इतर महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे, 


1883- स्वामी दयानंद सरस्वती यांचे निधन
 
आर्य समाजाचे संस्थापक आणि शुद्धीकरण चळवळीचे प्रणेते स्वामी दयानंद सरस्वती (Swami Dayananda Saraswati) यांचे आजच्या दिवशी, 30 ऑक्टोबर 1883 रोजी निधन झालं होतं. स्वामी दयानंद सरस्वती हे भारतीय समाजसुधारक होते. आक्रमक आणि निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचा सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ प्रसिद्ध आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वरील ग्रंथामध्ये आर्य समाजाच्या तत्त्व विचारांची मांडणी केलेली आहे. 


वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी दयानंदांनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. वेदांतील तत्त्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी "सत्यार्थ प्रकाश" नावाचा ग्रंथ संस्कृत आणि हिंदी भाषेत लिहिला. सत्यार्थ प्रकाश ग्रंथात वैदिक धर्माचे यथार्थ स्वरूप प्रतिपादन करताना इतर पंथमतांचे खंडनही त्यांना करावे लागले.


1966- अणुउर्जा आयोगाचे जनक डॉ. होमी भाभा यांचे निधन


भारतीय अणु कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा (Dr Homi Bhabha) यांचं आजच्याच दिवशी 30 ऑक्टोबर 1990 साली मुंबईतील एका पारशी कुटुंबात जन्म झाला होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1948 साली त्यांनी पंतप्रधान नेहरुंच्या सहकार्याने अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. डॉ. भाभांचे अणुऊर्जेमधील संशोधन लक्षात घेता 1955 साली त्यांना आंतरराष्ट्रीय अणुशक्ती परिषदेचे अध्य़क्षपद देण्यात आले. डॉ. भाभांच्या प्रयत्नामुळेच 1956 साली ट्रॉम्बे येथे भारतातलीच नव्हे तर आशियातील पहिली अणुभट्टी 'अप्सरा' उभारण्यात आली. त्यानंतर 'सायरस' आणि 'झर्लीना' या अणुभट्ट्याही उभारण्यात आल्या. 


1945- भारत संयुक्त राष्ट्रांचा सदस्य 


30 ऑक्टोबर 1945 रोजी भारत संयुक्त राष्ट्रांचा सदस्य बनला. भारताला ब्रिटिशांच्या शासनांतर्गतच एका राष्ट्राचा दर्जा देण्यात आला होता. 


1956- पहिले पंचतारांकित हॉटेल अशोका दिल्लीत सुरू 


भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल अशी ओळख असलेले अशोका हॉटेल दिल्लीत सुरू झाले. या हॉटेलचे उच्चभ्रू लोकांना खास आकर्षण होतं. 


1961- रशियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली 


अमेरिका आणि रशियामध्ये शीतयुध्द सुरू होतं आणि ते शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेपर्यंत जाऊन पोहोचलं होतं. त्यातून कोणत्या देशाकडे जास्त अणुबॉम्ब आहेत याचीही स्पर्धा सुरू झाली. पण रशियाने या पलिकडे मजल मारून 30 ऑक्टोबर 1961 रोजी हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण (Soviet Russia Hydrogen Bomb Test) केलं. हायड्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बपेक्षा कित्येक पटींनी शक्तिशाली आहे. रशियाच्या या कृत्यानंतर (Tsar Bomba) जगभर त्याचा निषेध करण्यात आला होता. 


2008- आसाम बॉम्बस्फोटानं हादरलं, 66 जणांचा मृत्यू 


30 ऑक्टोबर 2008 रोजी आसमाच्या कोक्राझार जिह्यामध्ये तीन ठिकाणी तर गुवाहाटीमध्ये पाच ठिकाणी, तसचे बोंगाईगावमध्ये तीन आणि बरपेटामध्ये दोन ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या बॉम्बस्फोटामध्ये 66 लोकांचा जीव गेला.