नवी दिल्ली : सीमेवर पाकिस्तानच्या खोड्या काही थांबायला तयार नाहीत. जम्मू काश्मीरमध्ये दोन भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करत त्यांचं शीर कापून नेण्याच्या घटनेने देशात संताप उफाळून आला आहे. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची मागणी होत आहे. पण या सगळ्या गदारोळात सरकारची संरक्षण खात्याबद्दलची उदासीनताही चर्चेचा विषय बनली आहे. मनोहर पर्रिकर यांच्या राजीनाम्यानंतर आता 50 दिवस होत आले, तरी देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री मिळालेला नाही.
एकीकडे आपल्या मुलाला गमावल्याचं दु:ख तर आहेच, पण दुसरीकडे पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर दिलं जात नसल्याबद्दलची खंत शहीद परमजीत सिंह यांच्या कुटुंबीयांमध्ये आहे. पूंछमधल्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये काल पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने परमजीतसिंह आणि प्रेमसागर या दोन भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली, त्यांचं शीर कापून नेलं.
पाकिस्तानाला चोख उत्तर देण्याची भाषा सरकारने यावेळेसही केली आहे. काल ज्या चौकीतून हा हल्ला झाला होता ती उद्ध्वस्त करुन त्यांचे 7 सैनिक मारल्याचा दावाही करण्यात आला आहे. पण प्रश्न एवढ्यावरच थांबत नाही. आता जवळपास 50 दिवस होत आले तरी देशाला अजून पूर्णवेळ संरक्षणमंत्री लाभलेला नाही. मोदी सरकारच्या काळात सलग दुसऱ्यांदा काळजीवाहू संरक्षणमंत्री म्हणून अरुण जेटलीच काम पाहत आहेत.
12 मार्चला गोव्यात भाजपचं सरकार स्थापण्यासाठी मनोहर पर्रिकर यांची रवानगी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा अरुण जेटलींवरच ही जबाबदारी येऊन पडली. संरक्षण खात्याच्या शस्त्रखरेदीच्या व्यवहारांवर विरोधकांचं बारीक लक्ष असतं. कुठलीही चूक घोटाळ्याची आवई उठवायला कारणीभूत ठरु शकते. म्हणूनच मोदींनी सर्वात विश्वासूसहकारी, ज्यांना कायदा आणि अर्थशास्त्र या दोन्हींची जाण आहे, अशा जेटलींवरच भरवसा ठेवला.
पण अर्थ आणि संरक्षण अशी दोन्ही महत्त्वाची खाती एकाच माणसाने सांभाळणं शक्यही नाही. त्यामुळे त्या खात्यालाही न्याय मिळत नाही. पाकिस्तानच्या कुरघो़ड्या वाढत चाललेल्या असताना, तिकडे अरुणाचल सीमेवर चीनच्या कांगाळ्या सुरु असताना या खात्याला पूर्णवेळ मंत्र्याची किती गरज आहे हे नव्याने सांगायला नको.
8 नोव्हेंबरला नोटबंदीचा निर्णय जाहीर करताना त्यामुळे दहशतवादांचं कंबरडं मोडेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. पण तो किती तकलादू आहे हे अवघ्या सहा महिन्यांतच समोर येऊ लागलं आहे.
जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्याचे प्रकार पाकिस्तानने याआधीही केले आहेत. गेल्या सहा महिन्यातच तब्बल तीन वेळा अशा घटना घडल्या आहेत
- 28 ऑक्टोबर 2016 - जम्मू काश्मीरमधल्या कूपवाडामध्ये फायरिंगदरम्यान शहीद झालेल्या एका भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना पाकिस्तान लष्कराने केली
- 22 नोव्हेंबर 2016 - पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसून केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. त्यातल्या एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती.
- 1 मे 2017 - त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच कालची घटना घडली.
कालच्या घटनेनंतर पाकिस्तानवर पुन्हा एका सर्जिकल स्ट्राईक करा, असेही आवाज उठू लागले आहेत. सगळीकडेच सीमा तापलेल्या असताना देशाला पूर्णवेळ संरक्षण मंत्र्यांची जास्त गरज आहे. मध्यंतरी पंतप्रधान मोदी हे खातं स्वताकडेच ठेवणार अशीही चर्चा होती. पण अद्याप तसं काही झालेलं नाही. त्यामुळे एकीकडे सीमेवरचा तणाव वाढत असतानाच ही नेमणूक तातडीनै करण्याचा दबावही सरकारवर वाढत जाणार आहे.
संबंधित बातम्या
शहीद परमजीत सिंह यांना अखेरचा निरोप, अंत्यसंस्कारासाठी कुुटुंबीय राजी
पाकच्या दोन लष्करी छावण्या उद्ध्वस्त भारताचं सडतोड उत्तर
पाकिस्तानकडून भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना