श्रीनगर : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले पंजाबचे वीरपुत्र परमजीत सिंह यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पंजाबमधील तरनतारण या मूळगावी अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्या, अशी मागणी तिथे उपस्थित जनसमुदायाने केली.

दरम्यान "परमजीत यांचं संपूर्ण शरीर मिळेपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही. मला माझ्या पतीचं संपूर्ण शरीर हवं आहे," अशी भूमिका परमजीत यांच्या पत्नीने घेतली होती. "जर शरीर छिन्नविछिन्न झालं आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री अमरिंदर सिंह भेटायला येणार नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही," असंही परमजीत सिंह यांच्या पत्नी म्हणाल्या होत्या.

अखेर अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर कुटुंब अंत्यसंस्कार करण्यास तयार झालं.



भारताचं चोख प्रत्युत्तर



जम्मू काश्मीरमध्ये पुंछ सेक्टरकच्या कृष्णा खोऱ्यात भारतीय सैन्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याने जोरदार कारवाई करत पाकिस्तानच्या दोन लष्करी छावण्या उद्ध्वस्त केल्या आहेत. या कारवाईत पाकिस्तानचे सात सैनिक ठार झाले आहेत.

पाकिस्तानच्या या दोन्ही लष्करी तळावर 647 मुजाहिद बटालियनचे सुमारे 10 ते 16 सैनिक तैनात होते.

शहीदांची विटंबना



पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अक्शन टीमने (BAT) भारतीय सीमेत 250 मीटर आत घुसखोरी करत गोळीबार केला. यानंतर भारतीय जवांनाच्या मृतदेहांची विटंबना करत, बीएसएफचे जवान परमजीत आणि प्रेम सागर यांचं शीर धडापासून वेगळं करुन घेऊन गेले. बॉर्डर अक्शन टीमच्या 647 मुजाहिद बटालियनने घुसखोरीसाठी पाकिस्तान लष्कराकडून किरपान आणि पिंपल पोस्टमधूर कव्हर फायरिंग केली होती

सैन्याचे जेसीओ आणि बीएसएफचे हेडकॉन्स्टेबल शहीद



पुंछमध्ये शहीद झालेल्या जवानांमध्ये सैन्याचे जेसीओ नायब सूभेदार परमजीत सिंह आणि बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांचा समावेश आहे. परमजीत सिंह 1995 पासून देशाच्या सेवेसाठी सैन्यात दाखल झाले होते. तर शहीद प्रेम सागर हे बीएसएफच्या 200 व्या बटालियनमध्ये तैनात होते. ते 1994 मध्ये बीएसएफमध्ये सामील झाले होते. मागील तीन वर्षांपासून ते जम्मूच्या सांबामध्ये तैनात होते.

अमानवी कृत्य, भारत उत्तर देणार : संरक्षणमंत्री



पुंछमधील हल्ल्याचा सरकारने जोरदार निषेध केला आहे. हल्ल्याचा निषेध करताना संरक्षण मंत्री अरुण जेटली म्हणाले की, "आमच्या शेजारच्या देशाने कृष्णा खोऱ्यात दोन जवानांना मारुन त्यांची विटंबना केली. हे अमानवी कृत्य आहे. युद्धादरम्यान अशा घटना होत नाहीच, पण शांतीदरम्यानही होत नाहीत. संपूर्ण देशाचा सैन्यावर विश्वास आहे. भारत हल्ल्याचं चोख उत्तर देणार. शहीदांचं बलिदान वाया जाणार नाही.

पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक?

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहे. जाणकारांच्या मते, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सातत्याने कठोर पावलं उचलायला हवीत. म्हणजेच पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकसारखाच मोठ्या सर्जरीची गरज आहे.

भारताचा आरोप चुकीचा

दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतावरील गोळीबाराचं तसंच जवानांची विटंबना केल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. "पाकिस्ताने सैन्याने कोणत्याही प्रकारे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं नाही. जवानांची विटंबना केल्याचा आरोप चुकीचा आहे. पाकिस्तानी लष्कर प्रोफेशनल आहे आणि ते जवानांसोबत अपमानजनक कृत्य करत नाही", असं पाकिस्तानने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

पाकच्या दोन लष्करी छावण्या उद्ध्वस्त भारताचं सडतोड उत्तर

पाकिस्तानकडून भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना