नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत मालवली. ते 93 वर्षांचे होते. किडनी संसर्गामुळं वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


वाजपेयींनी तीन वेळा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं. जिंदादिल राजकारणी, हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचीत होते. हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकले असूनही वाजपेयींनी नेहमीच धर्मनिरपेक्षतेची बाजू घेतली. त्यामुळेच त्यांना ‘राईट मॅन इन राँग पार्टी’ असं म्हटलं गेलं.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मूत्रसंसर्ग म्हणजे यूरिन इन्फेक्शन झाल्यामुळे तज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत होती. मात्र त्यांना डिमेन्शिया म्हणजे स्मृतीभ्रंश झाला होता.

सभा, मैफिली आपल्या अमोघ वक्तृत्वाने गाजवणारा हा नेता अचानक एकाकी पडला. या अफाट व्यक्तिमत्वाला एका आजाराने जखडलं आणि तब्बल एक दशक त्यांना बेडवर पडून काढावं लागलं. वाजपेयी 2009 पासूनच अंथरुणाला खिळले आहेत.

डिमेन्शिया म्हणजे काय?

डिमेन्शिया हा ठराविक आजार नाही, तर मनोवस्था आहे. स्मृतीभ्रंशाशी निगडीत अनेक लक्षणांना एकत्रितपणे डिमेन्शिया असं संबोधलं जातं. स्मृती, भाषा, एकाग्रता, तर्कशुद्धता, दृष्यमानता यापैकी कोणत्याही दोन मानसिक कार्यांमध्ये असंतुलन असल्यास 'डिमेन्शिया' झाल्याचं म्हणू शकतो.

अल्झायमर हा मेंदूशी निगडीत आजार जडल्यास डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढते. डिमेन्शियाच्या 60 ते 80 टक्के केसमध्ये अल्झायमर हे कारण असतं. त्याशिवाय स्ट्रोक, डिप्रेशन, औषधांचे साईड इफेक्ट, मद्यपान ही डिमेन्शियाची कारणं ठरु शकतात. थायरॉईड किंवा जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारा डिमेन्शिया बरा होऊ शकतो.

वयोमानानुसार माणसाची स्मरणशक्ती कमी होत जाते. मात्र अल्झायमरमुळे मेंदूची कार्यक्षमता झपाट्याने कमी होते आणि रुग्णाचा शॉर्ट टर्म मेमरी लॉस होण्याची शक्यता असते. अशा रुग्णाला सतत निगराणीखाली ठेवण्याची आवश्यकता असते.

तुम्ही आपल्या परिचितांची नावं, दैनंदिन कार्य विसरता, नेहमीच्या जागाही तुमच्या लक्षात राहत नाहीत. काही केसेसमध्ये माणसं घरी जाण्याचा पत्ता विसरतात. असं दिशाहीन भटकत असतानाच डिमेन्शिया पेशंटचे अपघाती मृत्यू अधिक झालेले आहेत.

दिल्लीतल्या मनोहर लाल शर्मा यांची केस अशीच भयानक आहे. पाच दिवस घराबाहेर भटकल्यानंतर डिहायड्रेशनमुळेच त्यांचा मृत्यू झाला. कारण, पाणी प्यायची आठवणही त्यांना राहिली नव्हती. त्यामुळे आजार साधा दिसत असला तरी कधीकधी तो इतकं भयानक रुप घेतो.

सरकारी पातळीवर डिमेन्शियाकडे दुर्लक्ष

सरकारी पातळीवर अजूनही या आजाराला फारसं गांभीर्याने घेतलं जात नाही. डिमेन्शिया पीडित रुग्णांसाठी देशात जे सात डे केअर सेंटर आहेत, त्यांना 2015-16 या एकूण वर्षभरात सरकारकडून मिळालेला निधी होता केवळ 66 लाख रुपयांचा. आजाराचं निदान न झाल्यामुळे अनेकदा व्यक्तीवर उपचारही होत नाहीत