नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत मालवली. ते 93 वर्षांचे होते. किडनी संसर्गामुळं वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

93 वर्षीय वाजपेयींना विविध आजारांनी ग्रासलं होतं. त्यांना किडनी संसर्ग तर होताच, शिवाय मूत्रसंसर्ग, छातीदुखी, मधुमेह यासारख्या आजारांनी वाजपेयी त्रस्त होते.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर राष्ट्रीय स्मृतिस्थळी उद्या (17 ऑगस्ट) संध्याकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.


वाजपेयींनी तीन वेळा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं.  जिंदादिल राजकारणी,  हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचीत होते. हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकले असूनही वाजपेयींनी नेहमीच धर्मनिरपेक्षतेची बाजू घेतली. त्यामुळेच त्यांना ‘राईट मॅन इन राँग पार्टी’ असं म्हटलं गेलं.

66 दिवसांपासून रुग्णालयात

93 वर्षीय अटल बिहारी वाजपेयी यांना 11 जून 2018 रोजी उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं. किडनीच्या आजारामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. वाजपेयी 2009 सालापासूनच आजारी होते. त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागतो. अटल बिहारी वाजपेयी हे डिमेंशिया आजाराने त्रस्त होते.

तीन वेळा पंतप्रधान

अटल बिहारी वाजपेयी यांनी तीनवेळा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं. पहिल्यांदा 1996 मध्ये ते पंतप्रधान झाले. मग 1998 आणि 1999 ते 2004 या काळात त्यांनी पंतप्रधानपद भूषवलं.

पत्रकार, राजकारणी, कवी, लेखक

वाजपेयी हे केवळ राजकारणी नव्हते तर त्यांनी पत्रकार, कवी, लेखक अशा अनेक क्षेत्रात काम केलं. राजकारणात येण्यापूर्वी ते पत्रकार होते. काश्मीरमध्ये परमिट सिस्टम लागू करण्यात आलं होतं, तेव्हा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींसोबत पत्रकार म्हणून वाजपेयी काश्मीरला गेले होते. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा नजरकैदेत मृत्यू झाला. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी राजकारणात येण्याचं निश्चित केलं. दरम्यानच्या काळात त्यांनी कवी, लेखक म्हणूनही नाव कमावलं होतं.

भारत रत्न

अटल बिहारी वाजपेयी यांना मोदी सरकारने 2015 मध्ये देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारत रत्नने गौरवलं. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना घरी जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचवेळी त्यांचा अनेक वर्षांनी फोटो समोर आला होता.

वैयक्तिक आयुष्य

अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वाल्हेरमध्ये झाला. त्यावेळी भारत इंग्रजांच्या गुलामीत होता. त्यांचं जन्म ठिकाण म्हणजे ग्वाल्हेर हा आता मध्य प्रदेशचा भाग आहे. महात्मा गांधीजी काँग्रेसचे पहिले आणि शेवटचे अध्यक्ष बनले, त्याच दिवशी अटल बिहारी वाजपेयींचा जन्म झाला.

'मी अविवाहित, पण ब्रम्हचारी नाही'

अटल बिहारी वाजपेयींचं वैयक्तिक आयुष्यही अत्यंत रंजक आहे. राजकारणाच्या पलिकडचे अटल बिहारी वाजपेयी अत्यंत हळव्या मनाचे आहेत. कवी मनाचे आहेत. राजकारणाच्या चर्चांमध्ये दबक्या आवाजात त्यांच्या प्रेमाचीही चर्चा झाली. राजकुमारी कौल यांच्यावर त्यांचं प्रेम होतं आणि त्यांच्यासोबतही कौल राहिल्या. मात्र अटल बिहारी वाजपेयींनी कधीच जाहीरपणे हे सांगितले नाही. मात्र, 'मी अविवाहित आहे, पण ब्रम्हचारी नाही', असे सांगायला मात्र ते डगमगले नाहीत.

अटल बिहारी वाजपेयींना कुणी अपत्य नाही, मात्र त्यांनी नमिता कौल हिला दत्तक मुलगी मानलं, तिला सांभाळलं. नमिता कौल यांचं लग्न रंजन भट्टाचार्य यांच्याशी झालं.

राजकीय कारकीर्द

1942 साली भारत छोडो आंदोलनावेळी अवघ्या भारतात स्वातंत्र्य संग्रामाचे वारे वाहू लागले होते, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींनी राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसविरोधात आपलं अवघं राजकारण करणाऱ्या वाजपेयींनी सुरुवातीपासूनच आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली. 1977 साली जनता पार्टीच्या सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री बनले. 1996 साली पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यानंतर 1998 आणि 1999 मध्येही ते पंतप्रधान बनले. पंतप्रधानपदाचा पहिला कार्यकाळ केवळ 13 दिवसांचा होता. म्हणजे 16 मे 1996 ते 1 जून 1996. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्यावेळी पंतप्रधानपदी ते 19 मार्च 1998 ते 22 मे 2004 या कालावधीत राहिले.

अटल बिहारी वाजपेयी मूळचे ग्वाल्हेरचे. मात्र 1991 ते 2004 पर्यंत त्यांनी लखनऊचं लोकसभेत प्रतिनिधित्त्व केलं. वाजपेयी हे एकमेव काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षाचे पंतप्रधान आहेत, ज्यांनी पंतप्रधानपदाची 5 वर्षांची कारकीर्द पूर्ण केली.

अटल बिहारी वाजपेयीने 1998 मध्ये पंतप्रधान असताना पोखरण-2 अणूचाचणी केली. त्यांच्या काळात पाकिस्तानविरोधात कारगिल युद्धही झालं आणि त्यात भारताचा विजय झाला.

क्या हार में, क्या जीत में,

किंचित नहीं भयभीत मैं,

कर्त्तव्य पथ पर जो भी मिला,

यह भी सही, वो भी सही

वरदान नहीं मांगूंगा

हो कुछ पर हार नहीं मानूंगा।

-    अटल बिहारी वाजपेयी